शेततळ्यात पडलेले दोन घोणस टोपलीतून बाहेर काढताना सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील सर्पमित्र प्रा सदाशिव पाटील यांनी गेल्या दोन दिवसात मनुष्य वस्तीत आलेल्या ४ घोणस व एका फुरसे सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.
यात वसंत कांबळे या ढोलगरवाडी येथील शिक्षकांच्या घरी रात्री साडेदहा वाजता घोणस साप मिळाला. दुपारी दोन वाजता भाऊराव संभाजी पाटील यांच्या विहिरीत पडलेल्या घोणस सापाला बाहेर काढून जीवदान दिले. तसेच मांडेदुर्ग या ठिकाणी धामणेकर यांच्या शेततळ्यात मिलनातील दोन घोणस पाण्यात पडल्याने त्यांना सुध्दा बाहेर काढून जीवदान दिले. यावेळी काठी लांब बांबू काठीच्या सहाय्याने बांबुंची मोठी टोपली शेततळ्यात सोडून त्या साह्याने या दोन सापांना सदाशिव पाटील यांनी स्वतः धोका पत्करून बाहेर काढले. याशिवाय चंदगड तालुक्याच्या पूर्व भागात दुर्मिळ असणारा विशेषतः कोकण व सह्याद्री घाटमाथा परिसरात आढळणारा फुरसे जातीचा विषारी साप मांडेदुर्ग येथे मिळाला. अशा सर्व विषारी पाच सापांना पकडून रेस्क्यू केले.
घोणस साप हे निशाचर म्हणजे रात्रीच्या वेळी बाहेर पडणारे साप आहेत. सध्या सापांचा मिलन काल असल्याने नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी गेल्या ३५ वर्षांत मनुष्यवस्थित घुसलेल्या सहा हजारांपेक्षा अधिक सापांना पकडून त्यांना जीवदान दिले आहे.
मागील आठवड्यात कालकुंद्री, (ता चंदगड) येथेही अशाच पद्धतीने रात्रीच्या वेळी मनुष्य वस्ती लगत आलेल्या दोन अतिविषारी घोणस सापांचा गाडीखाली सापडून मृत्यू झाला होता.
विविध कारणांमुळे सध्या घोणस सापांची संख्या वाढली आहे. जंगल व शिवारात मोरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यांचे खाद्य साप असल्याने बरेचशे साप जीव वाचवण्यासाठी मनुष्यवस्तीकडे धाव घेत आहेत. त्यातच त्यांचा सध्या मिलन काळ असल्याने. सापांच्या बाबतीत अशा घटना घडत आहेत.
No comments:
Post a Comment