कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
निट्टूर, ता. चंदगड येथील शालेय 'आठवडी बाजार' उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. छोट्या बाल व्यापाऱ्यांनी आणलेल्या भाज्या, फळे, वाण सामान व खाऊचे पदार्थ याची खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. पंचक्रोशीत हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.
श्री गणेश प्राथमिक विद्यामंदिर निट्टूर शाळेतील शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बालपणापासूनच खरेदी विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, आनंदातून व्यवहार ज्ञानाची सांगड घालता यावी, व्यवहारात नफा- तोटा अनुभवता यावा, प्रत्यक्ष अनुभवातूनच स्वयंरोजगाराची व स्वावलंबनाची जाणीव व कौशल्य प्राप्त व्हावे, यातून आर्थिक कमाई कशी होते? हे समजावे, या अनुभवातून भविष्यातील उद्योजक तयार होतील या उद्देशाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 'बाळगोपाळांचा आठवडी बाजार' हा उपक्रम राबवला. या आगळ्यावेगळ्या बाजारात रविवार सुट्टीचा दिवस असूनही इयत्ता पहिली ते चौथीच्या बाल व्यापाऱ्यांनी सर्व प्रकारची दुकाने नीटनेटक्या पद्धतीने मांडली होती.
गावातील मध्यवर्ती भैरवनाथ मंदिर परिसरात भरवण्यात आलेल्या या बाजारात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनेक वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटला. यावेळी दुकानदार झालेल्या बालकांचा उत्साह पराकोटीचा वाढल्याचे दिसत होते. यावेळी सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment