देवरवाडी येथील बालिकेवर यशस्वी हृदयरोग शस्त्रक्रिया, शालेय आरोग्य तपासणीत झाले होते निदान - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2024

देवरवाडी येथील बालिकेवर यशस्वी हृदयरोग शस्त्रक्रिया, शालेय आरोग्य तपासणीत झाले होते निदान


चंदगड : सी एल वृत्तसेवा

  राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अंगणवाडी (देवरवाडी, ता. चंदगड ) येथील उन्नती उत्तम मजुकर (वय ४ वर्षे) हिच्यावर यशस्वी हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली.

  शालेय आरोग्य तपासणी वेळी डॉ पल्लवी निंबाळकर यांना उन्नती हिला हृदयविकार असल्याचे आढळून आले. त्यांनी शिक्षकांना या बाबत कल्पना देऊन तिच्या पालकांशी संपर्क साधला. ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, डॉ. शिवराज कुप्पेकर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमजाळ यांचा सल्ला घेऊन प्राथमिक तपासणी करून तिला २-डी इको साठी डॉ. धनंजय साळवी यांच्याकडे पाठविले. त्यानंतर उन्नती हिच्या पालकांनी १० डिसेंबर रोजी हृदय शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. १३ डिसेंबर रोजी कु. उन्नतीची हृदय शस्त्रक्रिया डॉ. धनंजय साळवी यांनी यशस्वी केली. ह्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रमोद सुळीकेरी यांचे सहकार्य लाभले . 

   सध्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात १२ ते १५ लाख रुपये खर्च येत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालय चंदगड येथील अधिकाऱ्यांनी सी एल न्यूज शी बोलताना दिली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शालेय आरोग्य तपासणी दरम्यान अशा प्रकारचे निदान झाले असेल तर पालकांनी पूर्णपणे शासकीय खर्चात मोफत शस्त्रक्रिया करून घेणे योग्य आहे. असे निदान झाले असेल तर वेळ घालवून बालकाच्या आरोग्याशी पालकांनी खेळू नये असे आवाहन केले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर उन्नतीच्या कुटुंबियांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अमोल पाटील, डॉ शिवराज कुप्पेकर, डॉ. पल्लवी निंबाळकर यांच्या पथकासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment