चंदगड : सी एल वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी सव्वा दहा चे सुमारास घडली. यत्त्वाप्पा मल्लाप्पा गुड्डाकाई, वय ५० वर्षे, रा. बोळशनट्टी, ता हुक्केरी, जि. बेळगाव (सध्या रा. अडकूर, ता. चंदगड) असे मयताचे नाव आहे. याबद्दल बाबतची वर्दी मारुती यलाप्पा सनदी, वय ३० वर्षे व्यवसाय मजूरी (रा. बोळशनही, ता. हुक्केरी, जि. बेळगाव. सध्या रा. अडकूर, ता. चंदगड) याने चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली हकीगत अशी, वरील वेळी यातील मयत हा अडकूर गावाचे हद्दीत सदानंद देसाई यांच्या गावठाण नावाचे शेतात वर्दीदार मजूर मारुती याच्यासोबत भाताचे पिंजर गवत जमा करण्यासाठी गेला होता. सकाळी दहा वाजता शेताला लागून असलेल्या ओढा काठावर प्राथ:विधीसाठी गेला असता त्याला तेथे असलेल्या गवा रेड्याने मारून जखमी केले. यावेळी त्याच्या डोकीस, डावा हात, खांदा याला मार लागला. कानातून रक्त येऊन रक्तबंबळ झाला. त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. यानंतर वर्दीदार यांनी समक्ष चंदगड पोलीस ठाणे येथे हजर राहून वर्दी दिल्याप्रमाणे मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा व प्राथमिक तपास करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशाने पोहेकॉ देसाई करत आहेत.
No comments:
Post a Comment