चंदगड : सी एल वृत्तसेवा
आंबोली, चौकुळ, इसापूर व्हाया पारगड, तेरवण, वाघोत्रे, हेरे, चंदगड ते बेळगाव अशी बस सेवा सुरू करावी. या मागणीसाठी आंबोली चौकुळ परिसरातील दत्ताराम विष्णू गावकर, निखिल राऊळ, सुदेश कडव, सत्यवान भोसले, तुकाराम गवस आदी ग्रामस्थांनी चौकुळ तिठ्ठा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षात ईसापुर ते चौकुळ मार्गे आंबोली जाण्यासाठी नवीन रस्ता करण्यात आला आहे. इथून सर्व प्रकारची वाहने येजा करत आहेत. तथापि या मार्गावर अजून एकही एसटी सुरू झालेली नाही. सध्य परिस्थितीत ईसापुर वरून आंबोली जायचे असेल तर चंदगड मार्गे साठ किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. पण चौकुळ मार्गे आंबोली जायचे असेल तर केवळ दहा किलोमीटर अंतर आहे.
चौकुळ हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात असल्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी ओरोस येथे जाण्यासाठी तसेच तालुक्याच्या ठिकाणी सावंतवाडी किंवा दोडामार्ग येथे जाण्यासाठी अनेक गाड्या बदलत जावे लागते प्रवासातील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात एका दिवसाच्या कामासाठी तीन दिवस खर्ची घालावे लागत आहेत. या परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक, शासकीय कामकाजासाठी तालुका व जिल्हा कार्यालयात जाणारे नागरिक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी तसेच बेळगाव किंवा अन्य ठिकाणी बाजारला जाण्यासाठी वेळ आणि पैसा कित्येक पटीने खर्च करावा लागत आहे. जर या परिसरातून म्हणजे आंबोली, चौकुळ, इसापूर, पारगड, हेरे, चंदगड मार्गे बेळगाव अशी ये जा करणारी सावंतवाडी, चंदगड किंवा बेळगाव डेपोची किमान एकतरी बस सुरू करावी. अशी मागणी होत आहे. या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रवाशांनी दिनांक ३१ डिसेंबर रोजी आंबोली तिठ्ठा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment