तिलारी- दोडामार्ग घाटात रस्ता खचलेल्या ठिकाणी मातीचे बॅरल ठेवून सुरक्षितता बाळगण्यात आलेली दिसत आहे. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड व दोडामार्ग तालुक्यांना जोडणाऱ्या तिलारी घाटात एका ठिकाणी गेल्या पावसाळ्यात जून २०२४ महिना अखेरीस रस्त्याकडे चा संरक्षण कठडा कोसळला होता. या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक १ जुलै ते ३१ ऑक्टोबर अखेर बंद करण्याचे आदेश दिले होते. हा बंदी आदेश कागदावरच राहिला आहे. केवळ एसटी वगळता सर्व प्रकारची लहान मोठी व अवजड वाहने यांची वर्दळ घाटातून सुरूच राहिली आहे. केवळ गरिबांची एसटी वाहतूक बंद राहिल्याने या मार्गावरून येजा करणाऱ्या चाकरमानी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी व रुग्णांचे हाल सुरू आहेत. सर्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांच्या दुटप्पी धोरणामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
३१ ऑक्टोबर संपून दीड महिना झाला तरी या ठिकाणी दुरुस्तीच्या कोणत्याच हालचाली नाहीत. दुसरीकडे ज्या ठिकाणी कठडा तुटला आहे, त्या ठिकाणी अपघाताची कोणतीच शक्यता नाही. हे एसटी पेक्षा दुप्पट तिप्पट वजनाची अवजड वाहने तिथून राजरोसपणे जात आहेत, त्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे एक तर जिल्हाधिकारी यांनी घाटातून बंद केलेली एसटी सुरू करावी किंवा तात्काळ दुरुस्ती तरी करावी. अशी अपेक्षा प्रवासी वर्गातून होत आहे. या घाटातून दिवसभरात कोल्हापूर, बेळगाव, चंदगड, राधानगरी ते दोडामार्ग, पणजी अशा अनेक फेऱ्या सुरू असतात. हे अंतर कमी असल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत नाही. तथापि बंदी आदेशामुळे अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी आंबोली घाटातून जाण्यासाठी चार ते पाच तास लागत आहेत. याचा महा भुर्दंड प्रवासी वर्गाला बसत आहे.
घाटातील रस्त्याची सध्या असलेली रुंदी निम्मी होती, तेव्हापासून म्हणजे ४५ वर्षांपूर्वी पासून येथून चंदगड आगाराच्या एसटीच्या अनेक फेऱ्या सुरू होत्या. मग पूर्वीपेक्षा दुप्पट रुंदी झाली असताना आत्ताच मार्ग धोकादाय कसा झाला? हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. घाटातील एसटी सुरू करावी यासाठी मार्गावरील सर्व गावांतील सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व त्यानंतर 31 ऑक्टोबर नंतर एसटी सुरू करण्याबाबतचे निवेदन दिले होते तरी सुद्धा एसटी सुरू करण्याच्या कोणत्याच हालचाली दृष्टीपथात नाहीत.
तथाकथित धोकादायक ठिकाणी दुसऱ्या बाजूला मातीचा भराव टाकून रस्ता अडीच ते तीन फुटांनी वाढवला आहे. त्यामुळे सर्व प्रकारची अवजड वाहने बिन दिक्कत धावत आहेत. त्यामुळे केवळ एसटीला धोका होण्याचे कारण नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी कार्यालय व बांधकाम विभाग यांनी तात्काळ एसटी महामंडळास ना हरकत पत्र द्यावे. अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment