प्रशांत आवळे |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
वर्ष अखेर विविध पर्यटन स्थळांवर 'एन्जॉय' करण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या आगाऊपणावर चार दिवस वनविभागाचा वॉच राहणार आहे. शनिवार दि २८ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या पाच दिवसांच्या कालावधीत आगळीक करणाऱ्या पर्यटकांना जबर दंड व शिक्षेला सामोरे जावे लागेल. असा इशारा पाटणे परीक्षेत्र वनअधिकारी वनक्षेत्रपाल प्रशांत ए. आवळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
वरील कालावधीत चंदगड तालुक्यातील पाटणे वनपरिक्षेत्रांतर्गत प्रामुख्याने तिलारीनगर, लष्कर पॉईंट, आंबेवाडी धरण, जंगमहट्टी धरण, सुंडी धबधबा, महिपाळगड किल्ला, वैजनाथ परिसर, तुडये धरण, पाटणे वाखण तसेच इतर छोट्या मोठ्या धरण व धबधब्यांच्या परिसरात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटन जमा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण करणे, मद्यपान करणे, जंगलाला वनवा लावणे किंवा वणवा लागेल अशी परिस्थिती निर्माण करणे. शिकार करणे, खुल्लडबाजी करणे, ग्रामस्थ व अन्य पर्यटकांना त्रास देणे इत्यादी अनुचित प्रकार करणाऱ्या पर्यटकांवर त्याच ठिकाणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. याकरिता वनक्षेत्र परिसरात ठिकठिकाणी चेक पोस्ट लावून वाहतूक नियमन करण्यात येणार असून जंगल परिसरात दिवसा व रात्री गस्त घालण्यात येणार आहे. तरी सर्वांना कळविण्यात येते की वरील कालावधीत पाटणे वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात विनापरवाना प्रवेश करून जंगल व पर्यावरणास हानी होईल असे कृत्य केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पर्यटकांना आर्थिक दंड व शिक्षा भोगावी लागेल. याची नोंद घ्यावी असा इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे रेंजर प्रशांत आवळे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment