डॉ.चंद्रकांत पोतदार |
चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या 'परिघाच्या रेषेवर' या समीक्षा ग्रंथाला येळूर (जि. बेळगाव) येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाचा 'गंगुबाई गुरव संकीर्ण साहित्य पुरस्कार' जाहीर झाला. यापूर्वी नुकताच या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा: वारणानगर, यांचाही 'स्व. विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार' पानिपतकार विश्वास पाटील, उपकुलसचिव डॉ. शिंदे यांचे हस्ते मिळाला आहे.
येळूर येथे 5 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. शरद बाविस्कर (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) यांच्या शुभहस्ते हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे. रोख रक्कम रु. ७०००/-, सन्मानचिन्ह, सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे संघाचे अध्यक्ष श्री. परशराम मोटराचे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. विविध विषयावरील त्यांचे लेखन साकारलेल्या 'परिघाच्या रेषेवर ' या समीक्षा ग्रंथाला हा आणखी एक पुरस्कार जाहीर आहे .कविता, ललित, समीक्षा या क्षेत्रातील त्यांचे लेखन साहित्यक्षेत्रात परिचित आहे.सीमा भागातील अनेक साहित्य संमेलनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. नव्याने लिहिणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देत त्यांना योग्य ते मार्गदर्शनही केले आहे.
अनेक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना, पाठराखण देऊंन नव्या लेखकांना प्रोत्साहन दिले आहे. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अनेक ग्रंथांना विविध संस्थांचे राज्यस्तरीय पातळीवरचे ही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सोलापूर , धारवाड, कराड अशा अनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यास मंडळ सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. डॉ. पोतदार यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करत त्यांच्या लेखनाला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, उपप्राचार्य प्रा. आर. बी. गावडे तसेच सर्व सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment