चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना अपघातात जखमी होऊन निधन झालेल्या रामपूर (ता. चंदगड) येथील राजेंद्र गोपाळ कांबळे या जवानावर त्यांच्या रामपूर या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.
`वीर जवान तुझे सलाम` `राजेंद्र कांबळे अमर रहे` `भारत माता की जय` अशा घोषणा देत हजारो लोक अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. तत्पूर्वी राजेंद्र यांचा मृतदेह खास विमानाने अकरा वाजता गावात आणला. गाव व पंचक्रोशीतील लोकांनी दर्शन घेतल्यानंतर मृतदेहाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झालेल्या संचालनात सेवानिवृत्त सैनिक वेल्फेअर असोसिएशन चंदगड, विखे चव्हाण पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सन २००६ मध्ये भारतीय सेना दलात दाखल झालेले राजेंद्र कांबळे चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे लाईनवर काम करत असताना झालेल्या अपघातात जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दिल्ली येथे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे अंत्यसंस्कार वेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.जवान कांबळे यांच्या अंत्ययात्रेच्या तयारीसाठी ग्रामपंचायत, सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ व ग्रामस्थ आणि विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत होते. अंत्यविधी वेळी चंदगड तालुका सेवानिवृत्त वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वतीने भारती जाधव, पोलीस ठाणे चंदगड आदींच्या वतीने पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
No comments:
Post a Comment