आजरा : सी एल न्यूज प्रतिनिधी
भारतीय लोकशाही टिकवायची असेल तर यापुढे सर्व प्रकारच्या निवडणुकांमधून ईव्हीएम मशीन हद्दपार झालीच पाहिजे. या मागणीसाठी उद्या सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी आजरा येथे महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजरा येथे नुकत्याच शरद पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस, श्रमिक मुक्ती दल, लाल बावटा गिरणी कामगार, रिपब्लिकन सेना आदी घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना कॉ संपत देसाई म्हणाले आपण मत कोणाला दिलं आहे हे कळण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे. पण एव्हीममुळे आपलं मत कुठं गेलं आहे हेच कळत नाही. किंवा दिलेले मत एव्हीएम मशीन हॅक करून बदलले जाऊ शकते अशी शंका आता प्रत्येक नागरिकाला वाटत आहे. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख संभाजी पाटील म्हणाले, इथूनपुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले एव्हीएम विरोधात आज-यातून सुरवात झाल्यानंतर महाराष्ट्रात रान पेटणार आहे. समीर चांद यांनी येथून पुढचा लढा महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्याची सूचना मांडली.
यावेळी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन लढा उभा करणे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून संघटितपणे विविध समस्येवर आंदोलने करणे, तसेच समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत कॉम्रेड संजय तर्डेकर, संजय घाटगे, प्रकाश मोरसकर, सुरेश दिवेकर आदींनी सहभाग घेतला. बैठकीस जनता बँक उपाध्यक्ष अमित सामंत, संचालक रणजीत देसाई, विक्रम देसाई, रविंद्र भाटले, दौलती राणे, हिंदुराव कांबळे, दौलती मिसाळ, अभिजीत मनगूतकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment