![]() |
कालकुंद्री शिवारातील विजेचे खांब असे धोकादायक पद्धतीने कलेलेले आहेत |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) शिवारातील विहिरींच्या मोटर पंप जोडणी साठी वीज वितरण कंपनीने उभे केलेले विद्युत खांब अनेक ठिकाणी वाकलेले आहेत. हे खांब शेतकऱ्यांना अनेक दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. असे खांब तात्काळ सरळ उभे करावेत अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मार्फत शिवारात शेतकऱ्यांच्या विहिरी, तलाव किंवा ओढाकाठी मोटर पंप बसवण्यासाठी विद्युत खांबांवरून तारा ओढण्यात आल्या आहेत. या खांबांची योग्य पद्धतीने उभारणी न केल्यामुळे गावोगावी शिवारात अनेक खांब धोकादायक पद्धतीने कलेलेले दिसत असतात. कालकुंद्री येथील किटवाड रोड परिसरातील वाडी शेत व कोलकार तग नावाच्या शेत दरम्यान शेती मोटर पंप साठी ओढण्यात आलेले काही खांब धोकादायक पद्धतीने वाकले आहेत. तर कललेले काही खांब झाडांच्या आधाराने तग धरून उभे आहेत. हे खांब खालची जमीन ओली झाल्यास किंवा जोराचा वारा आल्यास केव्हाही जमीनदोस्त होऊ शकतात. काही वेळा या ठिकाणी सोसाट्याचा वारा किंवा अन्यवेळीही जवळची डीपी व खांबांवरून स्पार्किंग होऊन खाली ठिणग्या पडत असतात. अशावेळी खाली असलेल्या ऊस शेतीला आगी लागण्याचा संभव नाकारता येत नाही. हे चंदगड तालुक्यातील घडलेल्या अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अशा आगी लागलेल्या वेळी सुरुवातीस घटनास्थळी नमती बाजू घेऊन नुकसान भरपाई देण्याची भाषा बोलणारे वितरण कंपनीचे अधिकारी थोडे दिवस गेले की तो मी नव्हेच या अविर्भावात हात वर करताना दिसतात. त्यामुळे हे खांब योग्य पद्धतीने तात्काळ सरळ उभे करून धोका टाळावा. अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तोंडी सांगूनही अधिकाऱ्यांनी दाद न दिल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कोवाड येथील कार्यालयात लेखी स्वरूपात मागणी केल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर उडवा उडवीची उत्तरे देणारे वितरण कंपनीची अधिकारी याची तात्काळ दखल घेतील का याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.
No comments:
Post a Comment