कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील तुकाराम सुबराव पाटील यांच्या राहत्या घराला बुधवारी रात्री अचानक आग लागली. या प्रसंगामुळे त्यांच्यावर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली. या संदर्भातील सी एल न्यूज पोर्टल चॅनल वरील बातमी वाचून श्री रवळनाथ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाटील कुटुंबियांची आपुलकीने चौकशी केली. आणि रुपये पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली. श्री रवळनाथ हाउसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड अँबेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या 'चांगुलपणाची चळवळ' या उपक्रमांतर्गत ही मदत देण्यात आली.
बुधवारी पाटील यांच्या घराला आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून जनावरांना बाहेर काढले. गडहिंग्लज येथील अग्निशामक बंब बोलावून आग आटोक्यात आणली. घटनास्थळी कोणीही नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टाळली परंतु तुकाराम पाटील यांचे या दुर्घटनेमध्ये ३ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने, संसार उपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले, तसेच राहत्या घराचे मोठे नुकसान झाले.
नेहमीच समाजातील अपघातग्रस्त जळीतग्रस्त गरिब व संकटात सापडलेल्या कुटुंब व दुर्बल घटकांसाठी सहकार्य केले जाते. अशा प्रसंगी माणुसकीच्या नात्याने हातबल झालेल्या बांधवांना धीर देण्याचे काम नेहमीच रवळनाथ कडून केले जाते. अशी माहिती रवळनाथ चे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी सांगितली. या मदतीबद्दल पाटील कुटुंबीय आणि कालकुंद्री ग्रामस्थामार्फत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सामाजिक बांधिलकीतून एम एल चौगुले यांनी तुकाराम पाटील यांना धीर दिला. यावेळी कालकुंद्री चे माजी सरपंच व चंदगड तालुका सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एम जे पाटील, रवळनाथ चे सीईओ डी के मायदेव, जनसंपर्क अधिकारी बाबासो मार्तंड, चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, पत्रकार संदीप तारीहाळकर, दयानंद कांबळे विनायक पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment