तिलारी घाटातील दुरुस्तीमुळे दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2025

तिलारी घाटातील दुरुस्तीमुळे दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी

 

घाटातील वाहतूक पूर्णपणे खंडित करण्यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूस असे लोखंडी ब्रॅकेट्स व मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

   तिलारी घाटातील जयकर पॉईंट उतारावर जून २०२४ मध्ये पहिल्याच पावसात संरक्षक कठडा व रस्त्याचा काही भाग खचला होता. यामुळे एसटी सह मोठ्या वाहनांना घाटातून केलेली वाहतूक बंदी आजतागायत सुरूच आहे. धरणे, उपोषण, रास्ता रोको, ठिय्या अशा आंदोलनानंतरही सात महिने रखडलेले होते. हे दुरुस्तीचे काम हाती सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी) पासून हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच वाहनांसाठी घाटतील वाट मोकळी होणार आहे. सध्या बांधकाम विभागाने घाटाच्या दोन्ही बाजूस 'काम चालू रस्ता बंद' चे सुचना फलक बांधकाम विभागाने लावले आहेत. घाट वाहतुकीस खुला होईपर्यंत आंबोली किंवा चोर्ला घाट या पर्यायी मार्गाने वाहतूक करावी असे आवाहन केले आहे.

  बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्यात जाण्यासाठी तिलारी- दोडामार्ग घाट जवळचा व सोयीस्कर असल्याने घाटात वाहनांची मोठी वर्दळ होती. तथापि संरक्षक कठड्याचा काही भाग खचल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने १ जुलैपासून गेले आठ महिने वाहतूक बंद आहे. वाहतूक बंदीचा सर्वाधिक फटका चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील वाहनधारक व प्रवाशांना बसला आहे. घाटातून वाहतूक सुरू करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. तरीही प्रशासनाने दाद दिली नव्हती. आता दुरुस्तीनंतरच एसटीसह सर्व वाहने सुरू होतील अशी अपेक्षा आहे. 

 दरम्यान २५ व २६ फेब्रुवारी रोजी दोन दिवस घाटाच्या खालील तेरवण, मेढे व पारगड मार्गावरील कण्वेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. यावेळी चंदगड व दोडामार्ग दोन्ही तालुक्यातील भाविक मोठ्या प्रमाणात ये जा  करत असतात. त्यामुळे हे काम ठेकेदाराने २५ फेब्रुवारी पूर्वी  पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

  ८-१० किलोमीटर लांबीच्या या घाटात दोन्हीकडे सूचनाफलक लावूनही वाहने घाटात उतरत होती. परिणामी दुरुस्ती कामात अडथळे निर्माण होत होते यावर रामबाण शकल म्हणून घाटाच्या दोन्ही बाजूला मातीचे मोठे ढगाळे व त्यावर बॅरेल मातीने भरलेले बॅरल लावून रस्ता पूर्णतः बंद केला आहे. आता  इथून दुचाकीवरून जाणेही अशक्य आहे. तरी सर्व वाहनधारकांनी इकडून न येता अन्य पर्यायी मार्ग वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

    तिलारी घाटाला पर्याय असलेल्या पारगड- मोर्ले रस्ता प्रश्नी आम. शिवाजीराव पाटील यांचे आश्वासन 

    चंदगड व दोडामार्ग तालुक्यांना दोन्हीकडे ये जा करण्यासाठी तिसरा व जवळचा पर्याय म्हणून पारगड- मोर्ले हा मार्ग आहे. पण पाच वर्षांपूर्वी खडीकरण होऊन या घाट रस्त्याचे काम थांबले आहे. मात्र इमर्जन्सी परिस्थितीत येथून वाहनांची येजा सुरू असते. सार्वजनिक बांधकाम व वन विभागाच्या खेचाखेचीत हा मार्ग अडकला नसता तर आज सर्व वाहतूक या मार्गानेच झाली असती. दोन दिवसांपूर्वीच चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी पारगड येथे भेट दिली. यावेळी या रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिल्याचे समजते.

No comments:

Post a Comment