सुस्थितीतील रस्ता उखडला, नवीन रस्ता करण्यास टाळाटाळ प्रश्नी निट्टूर येथे रास्तारोको, ठेकेदार अधिकारी धारेवर...! आश्वासनानंतर आंदोलन मागे - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2025

सुस्थितीतील रस्ता उखडला, नवीन रस्ता करण्यास टाळाटाळ प्रश्नी निट्टूर येथे रास्तारोको, ठेकेदार अधिकारी धारेवर...! आश्वासनानंतर आंदोलन मागे

 

निट्टूर येथे रास्तारोको आंदोलन करताना संतप्त प्रवासी, वाहनधारक व ग्रामस्थ

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   कोवाड ते माणगाव दरम्यानचा पावसाळ्यानंतर झालेल्या पॅचवर्कमुळे काहीसा सुस्थितीत असलेला रस्ता बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी नवीन करण्याच्या उद्देशाने दोन महिन्यांपूर उखडून टाकला आहे. मात्र हा रस्ता काही ठिकाणी खडीकरण तर काही ठिकाणी तसाच टाकून आता पुढील काम करण्यास ठेकेदार टाळाटाळ करत आहे. परिणामी या मार्गावरून दुचाकीसह कुठल्याही  प्रकारचे वाहन नेणे दुरापास्त झाले आहे.
    मार्गावरील निट्टूर, घुल्लेवाडी, म्हाळेवाडी, शिवणगे आदी गावच्या रस्त्यालगत घरे असलेल्या नागरिकांना धुळीमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मार्गावरील नागरिक, विद्यार्थी व नेहमीच्या प्रवाशांना श्वसनाच्या रोगांनी ग्रासले आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी चंदगड तालुका मनसेचे पदाधिकारी विवेक पाटील, तुकाराम पाटील आदींनी आंदोलनाचा इशारा दिला होता. तथापि त्याकडे ठेकेदार व बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केले होते.
   यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी आज दिनांक ७ फेब्रुवारी २०२५ रोजी निट्टूर येथे रास्ता रोको आंदोलन केले. भर दुपारी उन्हात शेकडो आंदोलक रस्त्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा दीपक पाटील, सरपंच गुलाब पाटील, मनसे सरचिटणीस तुकाराम पाटील, नामदेव पाटील आदींनी बांधकाम विभाग व ठेकेदारांना धारेवर धरले. कोवाड ते शिवणगे हा ८ किमी रस्ता २० मार्च च्या आत डांबरीकरण सह पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळेफासू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
 सार्व. बांधकाम विभागाच्या  शाखा अभियंता डी वाय यड्रॉवी सहाय्यक अभियंता एस बी भोगूलकर यांच्या  आश्वासनानंतर  ठिय्या आंदोलन मागे घेतले. 
  निट्टूर येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा या रस्त्यालगतच आहेत. येथील शाळांच्या इमारती धुळीने माखून गेलेल्या आहेत. या धुळीचा त्रास विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. दुसरीकडे कोवाड कॉलेजला माणगाव पासूनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने रोज येजा करत असतात. त्यांना शाळा कॉलेजचे जीवन नकोशी झाले आहे. कर्यात भागातील बऱ्याच वाहनधारकांनी या रस्त्या ऐवजी लांब अंतराचे पर्यायी रस्ते शोधले आहेत. याची दखल शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
   यावेळी उपस्थित असलेल्या ठेकेदारांनी आंदोलकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर "शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे आमची बिले वेळेवर दिली जाणार नाहीत, म्हणून आम्ही पुढचे काम थांबवले आहे." असे उत्तर दिले. यावर आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त करत "मग आमचा पूर्वीचा होता तसा रस्ता करून द्या" असे सांगितले.
  आंदोलनाची तीव्रता पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता डी वाय यड्रॉवी सहाय्यक अभियंता एस बी भोगूलकर  आंदोलन स्थळी उपस्थित झाले. काम लवकर सुरू करून २० मार्च २०२५ पूर्वी म्हणजे दीड महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
  यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंदगड पोलीस स्टेशन मार्फत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

No comments:

Post a Comment