कुदनूर बनतेय शासकीय अधिकाऱ्यांचा गाव...! गावातील तरुण, तरुणींची कौतुकास्पद कामगिरी - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2025

कुदनूर बनतेय शासकीय अधिकाऱ्यांचा गाव...! गावातील तरुण, तरुणींची कौतुकास्पद कामगिरी

 

संग्रहित छायाचित्र

कुदनूर : सचिन तांदळे / सी एल वृत्तसेवा 

      चंदगड तालुक्यातील सर्वाधिक लोकवस्तीचे गाव म्हणून ओळख असलेल्या कुदनूर गावाची अलीकडील काळात 'अधिकाऱ्यांचा गाव'  म्हणून लौकिक मिळवण्याकडे कौतुकास्पद वाटचाल सुरू आहे.  गावातील तरुण-तरुणी सध्या यूपीएससी, एमपीएससी अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रेमात पडले असून अशा परीक्षांमध्ये येथील तरुणांना लक्षणीय यश मिळतानाही दिसत आहे. बारावीच्या पुढील स्पर्धा परीक्षा किंवा अन्य कोणत्याही शैक्षणिक सुविधा नसतानाही येथील तरुण-तरुणी मिळवत असलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. 

       सन २००९ मध्ये गावातील दोन तरुण क्लास टू अधिकारी झाले. तेव्हापासून ही परंपरा सुरू झालेली दिसते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून किंबहुना त्यांचा आदर्श घेत गावातील तरुणांनी जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती व प्रयत्नवाद जोपासला आहे. त्याचे फळ तरुणांना पर्यायाने गावाला लाभत आहे. मधल्या काळात विविध कारणांनी कुप्रसिद्धी झालेल्या या गावाची ओळख बदलण्याची ताकद केवळ तरुण पिढीमध्येच आहे. अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचा आदर्श घेतल्यानंतर ७-८वर्षात किमान दहा विद्यार्थ्यांनी एम पी एस सी च्या माध्यमातून शासकीय अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. यावरून कुदनुर गावात गुणवत्ता ठासून भरली आहे पण तीला योग्य दिशा मिळत नसल्याने गाव परिसरातील इतर गावांच्या तुलनेत हा गाव मागे राहिला असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये बळावली आहे. या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी गावात ग्रामपंचायतने अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवून सुविधा निर्माण करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.

      कुदनूर हे कर्यात भागातील एक सधन गाव म्हणून ओळखले जाते. येथे कुस्ती व बैलगाडी शर्यतीचा वारसा सांगितला जातो. तसा सर्वाधिक भात पीक व मसूर पिकाचे उत्पादन घेण्यात ही अग्रेसर असलेला गाव अलीकडच्या काळात चंदगड तालुक्यातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा गाव म्हणूनही प्रसिद्धी पावला आहे. जुन्या चांगल्या परंपरेबरोबरच स्पर्धा परीक्षेकडे वळलेल्या तरुण-तरुणींना अधिक चालना देण्यासाठी गावात सुसज्ज वाचनालय, तज्ञ मार्गदर्शक असलेले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका, खेळाडू घडवण्यासाठी तज्ञ कोच व निवासी क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

       २१ व्या शतकात गावातील भावी पिढी सुशिक्षित, सुसंस्कारित व सशक्त करण्यासाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजे. यासाठी स्थानिक व तालुका पातळीवरील लोकप्रतिनिधी, शाळा कॉलेजचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन कमिटी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, युवक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन अशा विधायक कामांना गती द्यावी. अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment