चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक अजिंक्य किल्ले पारगड वर गडाचे पहिले किल्लेदार 'सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे' यांच्या स्मारकाचा प्रथम वर्धापनदिन मंगळवार दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सह्याद्री प्रतिष्ठान राष्ट्रीय संघटक प्रकाश नायर, नरवीर तानाजी मालुसरे व सुभेदार रायबा मालुसरे यांचे वंशज सुनील मालुसरे व प्रशांत मालुसरे यांच्या हस्ते सुभेदार रायबा मालुसरे यांच्या पंचधातूतील अर्ध स्मारकाचा अभिषेक करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्रमिक गोजमगुंडे सर यांच्या हस्ते परम पवित्र भगवा ध्वज फडकवण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची सवाद्य पालखी मिरवणूक स्मारकापासून भगवती- भवानी मंदिर, राज सदर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक , हनुमान मंदिर, पायऱ्यांवरील ध्वजस्तंभ पासून ते पुन्हा स्मारकापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग सेवक पारगड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मालुसरे कुटुंबीय व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यानंतर भवानी मंदिर येथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.श्रमिक गोजमगुंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष, अक्षता अंडरवॉटर सर्विसेस बेळगावचे मालक व निवृत्त नौदल अधिकारी अशोक के. पाटील (कालकुंद्री) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत सह्याद्री प्रतिष्ठान चे दुर्ग सेवक व मालुसरे कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले. प्रास्ताविक पारगड शाळेचे माजी शिक्षक व चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. त्यांनी प्रास्ताविक पर मनोगतात पारगड किल्ल्याचा इतिहास, गडावरील मावळ्यांचे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील व त्यानंतरच्या काळातील योगदान याबद्दल माहिती देताना गडावरील अपूर्ण पाणीपुरवठा योजनेमुळे येथील रहिवाशांचे पाण्याअभावी होत असलेले हाल, गडावरील अंतर्गत रस्ते, आदी समस्या तसेच पंचक्रोशीतील विविध अडचणी व मागण्यांचा ऊहापोह केला. यावेळी अशोक पाटील, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांची भाषणे झाली. अध्यक्ष डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांमार्फत विविध किल्ल्यांवर राबवले जाणारे उपक्रम याबद्दल माहिती देताना गडावरील हनुमान मंदिर समोर असलेली समाधी ही किल्लेदार रायबा मालुसरे यांचीच असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी चंदगड तालुक्यातील गंधर्वगडचा इतिहास शोधून तिथे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमानिमित्त गडावर आलेल्या सर्व शिवप्रेमींना भोजन व्यवस्था करणाऱ्या कालकुंद्री (ता चंदगड) येथील सरस्वती विद्यालयाच्या सन १९८१ इयत्ता १० वी वर्ग मित्रांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी पुढील वर्षीही या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांना भोजन व्यवस्था करणार असल्याचे वर्ग मित्रांनी जाहीर केले.
सुभेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी माजी नौदल अधिकारी अशोक के. पाटील व चंदगड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी प्रत्येकी रोख रुपये ५०००/- व विद्यमान अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी २२२२/- , तर चंदगड तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने ५५५५/- रु. मंडळाकडे सुपूर्द केले.
यावेळी पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच तुकाराम सुतार, ज्येष्ठ नागरिक राघोबा शिंदे, धोंडीबा बेर्डे, मालुसरे परिवार, पारगड सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरच्या संतोष मालुसरे, गोविंद मासरणकर, निवृत्ती कुट्रे, नीलम गावडे ,स्नेहल पिळणकर,तेजस चौगुले,पवन कोकितकर,प्रवीण पाटील,पंकज कोकीतकर,राज गावडे,तुषार चांदेकर,तेजस चांदेकर,तुकाराम बोलके,स्वप्निल कुराडे, गणेश मांगले.आदी दुर्ग सेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
कालकुंद्री येथील वर्ग मित्रांचा सन्मान करताना श्रमिक गोजमगुंडे
गडावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली
No comments:
Post a Comment