कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे सर्पदंशाने नऊ महिने गाभण असलेल्या म्हशीचा मृत्यू झाला. ही घटना काल दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी घडली. त्यामुळे म्हैस मालक शंकर लक्ष्मण कदम-गोंधळी यांचे सुमारे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेबद्दल गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शंकर गोंधळी यांनी दुपारी १२ च्या सुमारास आपल्या दोन म्हशी व बकरी नेहमीप्रमाणे दुपारी बाराच्या सुमारास चरायला सोडल्या होत्या. एक तासानंतर या म्हशीला त्यांनी ताम्रपर्णी नदीकाठी कागणी गावच्या घाटानजीक बांधले या परिसरात ते नेहमी म्हशीला बांधत असत. बांधल्यानंतर काही वेळात दीडच्या सुमारास नाहीस म्हशीचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्यावर आभाळच कोसळले.
या घटनेची माहिती तात्काळ जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी विनायक पाटील व गोकुळ दूध संघाचे वैद्यकीय अधिकारी नितीन गोटे यांना फोनवरून कळवली ते दहा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. ९ महिने गाभण असलेल्या मृत म्हशीचे पोस्टमार्टम केले. पोस्टमार्टेम नंतर हा मृत्यू सर्पदंशाने झाला असल्याचे दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी म्हशीच्या पोटातील रेडकू बाहेर काढले. रेडा असलेले हे रेडकूही मृतावस्थेत आढळले. यानंतर त्याच ठिकाणी जेसीबीच्या साह्याने खड्डा काढून म्हशीचे दफन करण्यात आले.
शंकर गोंधळी हे भूमिहीन शेतमजूर असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पारंपारिक गोंधळी व्यवसाय व दुग्ध व्यवसाय व शेळी पालन यावर चालतो. त्यांच्यावर ओढवलेल्या या संकट प्रसंगी गोकुळ दूध संघ व जिल्हा परिषद पशुधन विभाग यांच्याकडून आर्थिक मदत व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत काशिलिंग दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान संचालक एम जे पाटील, सेक्रेटरी तानाजी पाटील, पोलीस पाटील संगीता कोळी, कोतवाल शशिकांत सुतार व यादव गल्ली 'अ' कालकुंद्री मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment