आजचा शोध हे उद्याचे तंत्रज्ञान: डॉ. राजेश घोरपडे बीएड कॉलेज मार्फत शिनोळीत 'राष्ट्रीय विज्ञान दिन' - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2025

आजचा शोध हे उद्याचे तंत्रज्ञान: डॉ. राजेश घोरपडे बीएड कॉलेज मार्फत शिनोळीत 'राष्ट्रीय विज्ञान दिन'



चंदगड : सी एल वृत्तसेवा
    सत्य हे प्रयोगाच्या कसोटीवर टिकले पाहिजे, म्हणूनच प्रयोग हे विज्ञानाचे मूळ आहे. विज्ञान हेच सत्य आहे. विज्ञानामुळे तंत्रज्ञान विकसित झाले. मानवी जीवन सुलभ झाले. असे मत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णीचे प्राध्यापक डॉ. राजेश घोरपडे यांनी व्यक्त केले. ते महादेवराव बी. एड. कॉलेजतर्फे शिनोळी येथील राजर्षी शाहू विद्यालयात आयोजित 'राष्ट्रीय विज्ञान दिन' कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. जे. पाटील होते. 
   कार्यक्रमाची सुरुवात सर सी. व्ही. रामन यांच्या फोटो पूजनाने झाली. प्रास्ताविक स्मिता पाटील यांनी केले. पुढे बोलताना डॉ. राजेश घोरपडे यांनी ब्रह्मांडाच्या कुतुहालापासून ते लहानात लहान कणापर्यंतच्या विज्ञानाची मालिका ही संशोधकांनी कशी पादाक्रांत केली  याची विस्ताराने मांडणी केली.  वैज्ञानिकांचे योगदान, शोधाचे महत्त्व आणि मानवी जीवनावर विज्ञानाचा होणारा परिणाम आणि आपलं आयुष्य सुलभ करण्यासाठी असलेले विज्ञानाचे योगदान अशा सर्वच बाबींवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगतात एस. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा. अनेक वैज्ञानिकानी केलेल्या कार्याचा अभ्यास करून स्वतःला घडवावे असे मत व्यक्त केले.
विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणांची मांडणी केली होती.  यावेळी मुख्याध्यापक एन. टी. भाटे, एस. बी. कदम, ज्ञानेश कांबळे, बी. एड. कॉलेजचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका हारकारे यांनी केले. आभार मधूरा पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment