![]() |
आंबोली- तेरवण बस बेळगाव पर्यंत सोडावी या मागणीसाठी आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात निवेदन देताना रघुवीर शेलार |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक, वाहक, नादुरुस्त बस दुरुस्ती करण्यासाठी कार्यशाळेतील कर्मचारी व तंत्रज्ञ यांची नवीन भरती नसल्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर रिक्त पदांचा भार पडत आहे. किंबहुना हे कर्मचारी रिक्त पदावरील अतिरिक्त कामाची शिक्षा भोगत आहेत.
हीच अवस्था राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांची होत आहे. कमी प्रवासी, अपुऱ्या एसटी बसेस यामुळे अनेक मार्गावरील बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत किंवा अचानक रद्द केल्या जातात. परिणामी प्रवाशांना याचा मनस्ताप सोसावा लागतो. अनियमित बस फेऱ्यांचा फटका एसटीलाही बसत असून राज्यातील अनेक आगारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्याचीही शिक्षा कर्मचाऱ्यांनाच भोगावी लागते. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागातील एसटी बस संख्या वाढवण्याबरोबरच चालक, वाहक, तंत्रज्ञ व आगारातील कार्यशाळेतील कर्मचारी वाढवावे अशा आशयाचे निवेदन किल्ले पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी सावंतवाडी चे आमदार दीपक केसरकर तसेच परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहे.
प्रवासी व मार्गावरील ग्रामपंचायतींची मागणी लक्षात घेऊन जानेवारी २०२५ पासून आंबोली, चौकुळ, इसापूर मार्गे तेरवण बस सुरू करण्यात आली आहे. यामुळे आंबोली येथे आलेल्या पर्यटकांना ऐतिहासिक किल्ले पारगडला भेट देणे सोपे झाले आहे. तथापि या मार्गाचा सर्वे करताना रस्ता चौकुळ फाटा ते कुंभवडे दरम्यानचा घाट रस्ता विचारात न घेता फेरीसाठी कमी वेळ ठेवण्यात आला आहे. परिणामी वेळेचे बंधन पाळण्यासाठी चालक घाटातून घाईघाईने गाडी घाईने पळवण्याचा प्रयत्न करतात. यात चालक व गाडीतील प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेऊन तसेच चालक वाहक यांच्या मानसिकतेचा विचार करून आंबोली ते तेरवण प्रवासासाठी दिलेली निर्धारित वेळ वाढवावी.
दुसरीकडे नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या या मार्गावरील बस उत्पन्नाचे कारण दाखवून बस बंद होऊ शकते, हे टाळण्यासाठी हीच बस तेरवणपासून पुढे हेरे, मोटणवाडी, पाटणे, पाटणे फाटा मार्गे बेळगाव पर्यंत घेऊन पुन्हा याच मार्गाने परत आंबोली पर्यंत सोडावी. अशी मागणी प्रवाशांच्या वतीने रघुवीर शेलार यांनी निवेदनाद्वारे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांचेकडे केली आहे.
No comments:
Post a Comment