किल्ले पारगड येथे भवानी मंदिर परिसरात माजी आमदार राजेश पाटील यांनी ग्रामस्थ, पर्यटक व विद्यार्थी यांच्यासोबत छायाचित्र घेतले.
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगडचे माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी नुकतीच चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले पारगडला भेट देऊन आपल्या फंडातून सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या विकास कामांची पाहणी केली. आमदार नसलो तरी पारगड वरील विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले.
गडावर पोचल्यानंतर त्यांनी राज सदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी गडावर सहली निमित्त आलेल्या दाटे येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. भवानी मंदिर समोरील काही भाग अतिवृष्टीने दोन वर्षांपूर्वी कोसळला होता. या ठिकाणी धक्का भिंत बांधकामासाठी माजी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून ३० लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. या निधीतून झालेल्या बांधकामाची पाहणी त्यांनी यावेळी केली. भवानी मंदिर येथे उपस्थित ग्रामस्थ व पर्यटकांशी बोलताना पारगड सारख्या गडांचे संवर्धन ही काळाची गरज असून त्या अनुषंगाने आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. गडावरील सर्व तलाव फिरुन पाहून आलेल्या पाटील यांनी गडावरील पाण्याचा प्रश्न गंभीर असून गडावरील तलाव कोरडे पडत आहेत. हे तलाव पूर्ण कोरडे पडण्यापूर्वी सध्या अर्धवट स्थितीत असलेली नळ पाणी योजना कार्यान्वित झाली पाहिजे. याचबरोबर येत्या काळात गावांतर्गत खडीकरण होऊन अपूर्ण असलेले तसेच नवीन रस्ते डांबरीकरण करणे, गडावर जाण्यासाठी आपले वडील कै नरसिंगराव पाटील यांच्या आमदारकीच्या काळात झालेला रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करून शिवप्रेमी पर्यटकांना गडावर येणे जाणे, वाहतूक सुलभ होईल यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोल्हापूर, सांगली, बेळगाव, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यातून तसेच गोव्यातून गडावर आलेल्या शिवभक्त पर्यटकांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment