लेडी सिंघम सर्कल राजश्री पचंडी यांनी अतिक्रमणे हटवून खुला केला पाणंद रस्ता - चंदगड लाईव्ह न्युज

06 March 2025

लेडी सिंघम सर्कल राजश्री पचंडी यांनी अतिक्रमणे हटवून खुला केला पाणंद रस्ता

 

मौजे शिप्पूर येथे पाणंद रस्ता खुला झाल्यानंतर मंडल अधिकारी राजश्री पचंडी व ग्रामस्थ

चंदगड /सी एल वृत्तसेवा
    केवळ चंदगड तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शिवारात जाणारे पानद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. हे पानंद रस्ते खुले करून  शेतकऱ्यांसाठी वाहतूक सुलभ करण्याची कामे करणारे अधिकारीही अधून मधून येत असतात. कोल्हापूर जिल्ह्याचे तत्कालीन निवासी जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांचे नाव याबाबतीत अग्रक्रमाने घेतले जाते. सन २०११ ते २०१५ च्या दरम्यान त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील अतिक्रमणग्रस्त पानंद रस्ते खुले करण्याची मोहीम आखली होती. त्याला प्रतिसाद ही चांगला लाभला होता.
    धुळाज साहेबांचा आदर्श घेत लेडी सिंघम म्हणून परीचित असणाऱ्या हेरे मंडल अधिकारी (सर्कल) राजश्री पचंडी यानी मौजे शिप्पूर (ता. चंदगड) येथील अतिक्रमनाच्या विळख्यात सापडलेला पाणंद रस्ता खुला केला. यापूर्वी त्यांनी चंदगड तालुक्यातील दाटे विभागात तलाठी म्हणून काम करत असतानाही अनेक आनंद रस्ते खुले केले होते.
    नुकताच हेरे नजीकच्या मौजे शिप्पूर येथील गट नंबर ९४ नदीपासून ते गट नंबर १२ पर्यंतचा पाणंद रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून पासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला पानंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून वाहतुकीसाठी खुला केला. काही ठिकाणी या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले होते. रस्ता नसल्याने शेती मशागत व ऊस वाहतूक करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. शेतकऱ्यांची हिच अडचण लक्षात घेऊन पचंडी यानी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन पानंद अतिक्रमण मुक्त करण्याचे ठरवले. त्यांना या कामी तंटामुक्त अध्यक्ष बंडोपंत पाटील, विलास पाटील, ग्राम महसूल अधिकारी अंकुश लाटकर, पोलीस पाटील, सर्व शेतकरी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले व पानंद रस्त्याने मोकळा श्वास घेतला. 
   गडहिंग्लजचे प्रांताधिकारी  एकनाथ काळबांडे  यांनी शिप्पूर येथे भेट देत सर्व शेतकरी व मंडल अधिकारी राजश्री प्रचंड यांचे कौतुक केले. हा पानंद रस्ता खुला करण्यासाठी सर्कल व तलाठी यांना चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांचे मार्गदर्शन लागले. रस्ता खुला झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असून पचंडी यांच्या कार्याचा आदर्श घेऊन तालुक्यातील इतर भागातील सर्कल, तलाठी यांनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले पानंद रस्ते मुक्त करावेत. अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत असून यासाठी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी पुढाकार घ्यावा. प्रसंगी पोलिसांचे सहकार्य घ्यावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment