८ जून रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ चा थरार…! सलग चौथ्या वर्षी ६ गटात आंतरराष्ट्रीय दर्जाची 'मॅरेथॉन स्पर्धा' - चंदगड लाईव्ह न्युज

14 March 2025

८ जून रोजी ‘पारगड हेरिटेज रन’ चा थरार…! सलग चौथ्या वर्षी ६ गटात आंतरराष्ट्रीय दर्जाची 'मॅरेथॉन स्पर्धा'


चंदगड : श्रीकांत पाटील 
   ऐतिहासिक किल्ले पारगड वर दरवर्षी होणारी 'पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धा यंदा ८ जून रोजी होत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. 
   किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एलएलपी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन व चंदगड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ८ जून २०२५ रोजी होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी एक आव्हान असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव धावपटूंसाठी रोमांचकारी ठरणार आहे. गतवर्षी झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मुंबई ठाणे नाशिक बेळगाव हुबळी धारवाड कोणाची गोवा सह महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातील विविध गटातून तब्बल ६०० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. गयवर्षीच्या या स्पर्धा अभूतपूर्व ठरल्या होत्या. स्टाफ इंडियाचे सीईओ बिपिन चिरमुरे, तत्कालीन आमदार राजेश पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धा संपन्न झाल्या होत्या.
     यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष असून यावर्षीही स्पर्धा ‘जॉय ऑफ जंगल’ ५ किमी. ‘जंगल ड्रीम रन’ १० किमी व ‘जंगल हाफ मॅरेथॉन’ २१ किमी अशा तीन श्रेणीमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १ लाख रुपयाहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.  ‘निसर्गाचे रक्षक' मोहिमेंतर्गत निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांच्या प्रबोधना बरोबरच क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जनजागृती निर्माण व्हावी व महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले जाते.
स्पर्धेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे- ८ जून सकाळी ५ वाजता स्पर्धकांचे आगमन, कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती व नाष्टा, ६ ते ७ उद्घाटन व स्पर्धा प्रारंभ, ९ ते ११ पारितोषिक वितरण, निसर्ग संवर्धन विषयी मार्गदर्शन व परिसरात वृक्षारोपण होणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, पिण्याचे पाणी, ग्लुकोज आदी सुविधा उपलब्ध असतील. सहभागी सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र, आकर्षक पदक, फळझाडाचे रोपटे, टी-शर्ट तर विजेत्यांना यासह रोख बक्षीसे दिली जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी www.pargad.in या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन स्टाफ इंडिया, आऊट प्ले स्पोर्ट्स फाउंडेशन,  पारगड जनकल्याण संस्था मुंबई, ग्रुप ग्रामपंचायत मिरवल नामखोल पारगड यांच्यावतीने वतीने स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment