कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील श्री मळेकरणी देवीचा पाच दिवसीय सप्ताहाचा प्रारंभ शुक्रवार दि. १४/०३/२०२५ रोजी झाला असून सप्ताहाची समाप्ती बुधवार दि. १९ रोजी महाप्रसादाने होणार आहे. यावर्षीचा महाप्रसाद खीर, बुंदी असा गोड होणार असल्याने भाविक भक्तांनी महाप्रसादासाठी देणगी देताना साखर, गुळ, रवा, तेल, तांदूळ, कांदे, बटाटे किंवा रोख स्वरूपात द्यावी. असे आवाहन देवस्थान कमिटी मार्फत करण्यात आले आहे.
बेळगाव शहर, सीमा भाग व चंदगड तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या उचगाव येथील श्री मळेकरणी देवीची यात्रा वर्षभर आठवड्याच्या प्रत्येक मंगळवार व शुक्रवार भरत होती. मुसळधार पावसाचे काही दिवस वगळता वर्षातील सुमारे शंभर दिवस चालणाऱ्या मळेकरणी यात्रेत वर्षभरात लाखोंच्या संख्येने बकरी व कोंबडी कापली जात होती. जवळच असलेले बेळगाव सारखे मोठे शहर व समाजात वाढत चाललेल्या चंगळवादाला यात्रेच्या निमित्ताने अधिकच खतपाणी मिळत होते. आठवड्यातील दोन दिवस मंदिर परिसरात मटणाबरोबरच दारुचा महापूरच असायचा. यात्रेच्या निमित्ताने गावात शिरकाव करणारे हौसे, नवसे, गवसे सोबत दारुड्यांचा उच्छाद यामुळे उचगाव सारख्या शांतता प्रिय गावातील शांतता व संस्कृतिचा ऱ्हास सुरू झाला होता.
केरकचरा, बकरी व कोंबड्या कापलेली घाण व अनुषंगिक विविध कारणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. वर्षानुवर्षे सुरू असलेली ही प्रथा अलीकडच्या काळात धार्मिकतेच्या नावावर चंगळवादाला खत पाणी घालणारीच ठरत होती. हे ओळखून देवीचे हक्कदार, गावातील जाणती मंडळी तसेच देवस्थान कमिटी यांनी काही महिन्यांपूर्वी दर मंगळवार, शुक्रवारी होणारी पशु हत्या बंद करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेत त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली. कर्नाटक सरकारकडूनही निर्णयाचे स्वागत करण्यात आले व या निर्णयावर शासकीय शिक्कामोर्तब झाले. परिणामी आठवड्यातून दोन वेळा होणाऱ्या यात्रेच्या व धार्मिकतेच्या नावावरील बकऱ्यांची हत्या बंद झाली आहे. भाविकांना केवळ देवीची पूजा अर्चा, नारळ ओटी भरणे एवढीच मुभा देण्यात आली आहे. या निर्णयाचे भाविकांसह सर्व स्तरातून कौतुक झाले होते.
पशुहत्या बंदीच्या निर्णयानंतर होणारा देवीचा पहिलाच सप्ताह तोही गोड्या स्वरूपात करण्याचा निर्णय संबंधित पंच कमिटीने घेतल्यामुळे खऱ्या भाविकांमध्ये समाधान पसरले आहे.
No comments:
Post a Comment