चंदगड : सी एल वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले पारगड वर एकदा तरी मुक्काम करावा अशी प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा असते. तथापि अतिदुर्गम परिसर व गडावर राहण्याच्या सुविधांअभावी हे आजपर्यंत शक्य होत नव्हते. मात्र आता ही गोष्ट सहज शक्य झाली आहे. कारण १० फेब्रुवारी २०२५ पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे किल्ले पारगड वरील सर्व सुविधांनी युक्त असे 'हॉटेल गिरीदुर्ग'. गडावरील मूळ रहिवासी विठ्ठल राघोबा शिंदे यांनी पर्यटकांची गरज व मागणी ओळखून 'गिरीदुर्ग'च्या माध्यमातून ही सुविधा सुरू केली आहे.
गडावरील पश्चिम तटबंदीवरील या हॉटेलच्या बांधकामाला ऐतिहासिक वास्तूचा लुक लाभला आहे. हॉटेल इमारतीत एसी, नॉन एसी, सुसज्ज डबल बेड रूम उपलब्ध असून प्रत्येक खोलीत दूरदर्शन संच, पर्यटकांना साहित्य ठेवण्यासाठी कपाटे, उच्च दर्जाचे फर्निचर, शौचालय, अत्याधुनिक बाथरूम, वायफाय या सुविधा आहेत. प्रत्येक रूम मध्ये बसून निसर्ग सौंदर्य न्याहाळता येते. सायंकाळी मधुर चहाचा आस्वाद घेत रूमच्या बाल्कनीत बसूनच सहकुटुंब सूर्यास्ताचा स्वर्गीय आनंदही लुटता येतो. याचबरोबर पर्यटकांना चहा, नाश्ता व जेवण या सुविधा सुद्धा उपलब्ध असतील.
गडावर आल्यानंतर गडावरील प्रसिद्ध भगवती भवानी मंदिर, राज सदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, गडाचे पहिले किल्लेदार सुभेदार रायबा मालुसरे यांचे स्मारक, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गडावरील बुरुज, नैसर्गिक ताशीव कातळकडा, तटबंदी, गडाच्या दक्षिण व उत्तर तटबंदी लगत उभे असलेले टेहळणी टॉवर, याचबरोबर गणेश, गुंजन, फाटक, महादेव हे ऐतिहासिक चार तलाव व विहिरी अशी अनेक ठिकाणे पाहता येतील. दिवसा गडाच्या तटबंदी वरून फिरताना चंदगड तालुक्यातील शेवटचे गाव मिरवेल, या गावातूनच जाणारा पारगड- मोर्ले, घोटगेवाडी घाट रस्ता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भेकुर्ली व त्या पलीकडे दिसणारा मनोहरगड, दक्षिणेकडे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण जलाशय, पूर्वेकडे नामखोल गाव, त्यापुढे पारगड पासून २० किलोमीटरवरील कलानिधीगड, उत्तरेकडे इसापूर बाजूचे व गडाच्या सभोवती असणारे घनदाट राखीव जंगल क्षेत्र पाहण्याचा आनंद लुटता येतो. तर रात्रीच्या वेळी आपल्या रूम व बाल्कनीत बसूनच मोपा एअरपोर्ट तसेच गोवा राज्य व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचे दर्शन होते.
पारगड पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोटनवाडी किंवा हेरे मधून येताना वाटेत लागणारे कण्वेश्वर मंदिर व रामघाट ही ठिकाणे पाहता येतील. याशिवाय पारगडच्या २५-३० किलोमीटर परिसरातील आंबोली, बाबा धबधबा, सप्नवेल पॉईंट, तिलारी जलाशय, कोदाळी येथील माऊली मंदिर, तिलारी घाट व सर्च पॉईंट या ठिकाणी भेटी देता येतील.
पारगड किल्ल्यावर 'भागिरथी' इमारतीतील हॉटेल गिरीदुर्ग चे उद्घाटन चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता इफ्तिकार मुल्ला आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. माफक दरात अद्यावत सेवा असलेल्या 'गिरिदुर्ग' हॉटेलला पर्यटकांनी सहकुटुंब भेट देऊन ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटावा. रूम बुकिंग साठी मो. नं. 8369909315 / 8766990912 किंवा giridurg.pargad@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन विठ्ठल शिंदे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment