तिलारी घाटात सिमेंट टँकर अडकला..! वाहतूक पुन्हा बंद, वारंवारच्या घटनांमुळे प्रवासी वैतागले - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2025

तिलारी घाटात सिमेंट टँकर अडकला..! वाहतूक पुन्हा बंद, वारंवारच्या घटनांमुळे प्रवासी वैतागले

दोडामार्ग : सी एल वृत्तसेवा

      तिलारीनगर - दोडामार्ग घाटातील धोकादायक वळणावर सिमेंट प्रोसेस केलेले सिमेंट वाहतूक करणारा मोठा टँकर अडकल्याने पुन्हा वाहतूक बंद पडली आहे. चंदगड कडून दोडामार्ग कडे जाणारा हा टँकर २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे  अडकून पडला. यामुळे कोकण व गोव्यातून बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यात येणारी व जाणारी वाहतूक पुन्हा पूर्णपणे ठप्प झाली. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातून वेळेत जाणे येणे बेभरवशाचे झाले आहे. याचा सर्वाधिक फटका परीक्षा देणारे विद्यार्थी व रुग्णांना बसत आहे.

       महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना गोवा व कोकणला जोडणारा तिलारी घाट धोकादायक म्हणून ओळखला जातो. तथापि अंतर जवळ असल्याने व गुगल सर्च केल्यानंतर अनोळखी वाहनधारकांना हा धोपट मार्ग दिसत असल्याने सर्व प्रकारचे वाहनधारक या घाटातून प्रवास करताना दिसतात पण प्रत्यक्ष घाट सुरू झाल्यानंतर आपण मृत्यूच्या दाढेत येऊन अडक्याचे लक्षात येते. बहुतांश चालक येथील तीव्र व धोकादायक वळणे पाहताच अवसान गाळून बसतात. याचा परिणाम अपघात घडण्यात होतो. 

       घाटातील जयकर पॉईंट वळणावर रस्ता खचल्याने ९ महिने घाट वाहतुकीस बंद होता. ३ एप्रिल पासून वाहतुकीसाठी खुल्या केलेल्या या घाटात गेल्या पंधरा-वीस दिवसांत मोठी वाहने अडकून वाहतूक खंडित होण्याची ही तिसरी घटना आहे. हे पाहता या घाटातून छोटी वाहने किंवा दुचाकी घेऊन वेळेत जाता येईल याची शाश्वती राहिलेली नाही.  दहा, बारा किंवा चौदा चाकी मोठी वाहने दोडामार्ग कडून किंवा चंदगड पाटणे फाटा वरून पुढे जाताना आधीच थांबवल्यास अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे दोन्ही कडील सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस खात्याने केवळ बघ्याची भूमिका न घेता सतर्क राहून अशा वाहनांच्या घाटातील प्रवेशावर बंदी आणावी अशी मागणी पुन्हा होत आहे.

No comments:

Post a Comment