तब्बल ५० वर्षांनी वर्गमित्र एकत्र...! ढोलगरवाडी विद्यालयाच्या सन १९७४ मधील १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांकडून तत्कालीन शिक्षकांचा सन्मान - चंदगड लाईव्ह न्युज

21 April 2025

तब्बल ५० वर्षांनी वर्गमित्र एकत्र...! ढोलगरवाडी विद्यालयाच्या सन १९७४ मधील १० वी बॅचच्या विद्यार्थ्यांकडून तत्कालीन शिक्षकांचा सन्मान

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

      सर्पालयामुळे जगप्रसिद्ध असलेल्या मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हायस्कूलमधील इयत्ता दहावी  सन १९७४-७५ बॅचच्या वर्ग मित्रांनी तब्बल पन्नास वर्षानंतर एकत्र येत तत्कालीन शिक्षकांसह नुकताच आनंदोत्सव साजरा केला. 

      यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बॅचमधील हुशार विद्यार्थी वैजनाथ हुद्दार (बी. ई.  मेकॅनिकल) सध्या रा. पुणे यांनी भुषविले.  यावेळी तत्कालीन शिक्षक एम. एन. कुट्रे (रा. किणी), पी. एम. डागेकर (रा. शिनोळी),  व्ही. आर. गावडे (रा. तुर्केवाडी) आदींचा सन्मान करण्यात आला.  प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती लिला पाटील (माजी प्राचार्या व विद्यमान चेअरमन जिजामाता महिला बँक बेळगाव) श्रीमती शांता बाबुराव टक्केकर (संचालिका, शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी) प्रा. दीपक पाटील (उपसरपंच ढोलगरवाडी) यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.  

     प्रास्ताविक प्रा. रमेश भोसले यांनी पन्नास वर्षानंतर गुरु शिष्यांची भेट  घडवून आणण्याचे आपले ध्येय होते असे सांगितले. शेतकरी शिक्षण संस्था ढोलगरवाडी चे संस्थापक, आद्यसर्पमित्र व माजी मुख्याध्यापक कै. बाबुराव टक्केकर, कै. एन. एन. पाटील व अन्य दिवंगत शिक्षकांच्या स्मृतींना अभिवादन  करण्यात आले. स्वागत के. आर. पाटील यांनी केले. यावेळी धनाजी टक्केकर, सुरेश कोंबेकर, सुरेश देसाई, राजाराम पाटील, बाबाजी पाटील, बुधाजी पाटील, विठोबा ओऊळकर या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून पन्नास वर्षांपूर्वीच्या स्मृति जागृत केल्या. 

       आपले गाव सोडून आज मुंबई, पुणे, गोवा,  बेळगाव, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शेतकरी मित्रासोबत संपन्न केलेला हा मेळावा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक ठरला आहे. पन्नास वर्षापूर्वी छोटे असलेले विद्यार्थी आज ६७-६८  वर्षे वयाचे झाले यामुळे त्यांना आम्ही ओळखू शकत नसलो तरी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचा आनंद अवर्णनीय आहे. अशी मनोगते तत्कालीन व सध्या वयोवृद्ध झालेल्या शिक्षकांनी व्यक्त केली. दीपक पाटील, लीला पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, विद्यालयाचे लिपिक सर्पमित्र संदीप टक्केकर  यांनीही माजी विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. वाकोबा बोकडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment