प्रथम क्रमांक ची कुस्ती लावताना आमदार शिवाजीराव पाटील व मान्यवर
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथे शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक कुस्ती मैदानात महाराष्ट्र चॅम्पियन पै. रघु ठोंबरे याने उत्तर प्रदेश केसरी पै. अनुज ठाकूर याला दहाव्या मिनिटाला दुहेरी पट काढत चितपट केले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत हनुमान तालीम कंग्राळीचा कर्नाटक केसरी कामेश पाटील याने नॅशनल गोल्ड मेडल विजेता रोहन रंडे कोल्हापूर याला घुटना डावावर चितपट करून मैदानात उपस्थित हजारो कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली.
यावेळी उपस्थित चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, काशिनाथ कांबळे, अशोकराव देसाई, सरपंच अनिता भोगण, उपसरपंच रामचंद्र व्हन्याळकर, शंकर मनवाडकर, प्राचार्य एस टी कदम, राहुल देसाई, दिग्विजय देसाई, पांडुरंग जाधव, आदी मान्यवरांच्या हस्ते मैदान, छत्रपती शिवाजी महाराज व हनुमान प्रतिमापूजन करून कुस्त्या लावण्यात आल्या.
मैदानातील क्रमांक तीनच्या कुस्तीत पै. विजय जाधव शाहू आखाडा कोल्हापूर याने पै. सुनील करवते महाराष्ट्र चॅम्पियन याला पराभूत केले. क्रमांक चार च्या कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन पै. प्रेम जाधव (कंग्राळी) याने दुहेरी पट काढत नियोजित पैलवान किरण मासाळ (शाहू आखाडा कोल्हापूर) न आल्याने त्याऐवजी खेळलेल्या सचिन माने कोल्हापूर याला चितपट केले. याशिवाय अनुक्रमे पार्थ पाटील (कंग्राळी) याने सुदेश नरके (बानगे) याला अर्ध्या तासाच्या घमासान लढतीनंतर एकलंगी डावावर, तर पै. साहिल शेख (शाहू आखाडा कोल्हापूर) याने हप्ता डावावर पै.परसू हरिहर भांदुर गल्ली तालीम बेळगाव याला, कोवाडच्या पै. शुभम भोगण याने पै. प्रणव खादरवाडी याला घुटना डावावर चितपट केले. याशिवाय महत्त्वाच्या कुस्त्यांपैकी पै. कार्तिक जाधव निट्टूर विरुद्ध वैष्णव कुद्रेमणी, अतुल मगदूम नांदगाव विरुद्ध राजू डागेकर शिनोळी, रोहित तीर्थकुंडे मठपती आखाडा विरुद्ध प्रणव उचगाव तसेच आकर्षक कुस्ती मधील शुभम पाटील तेऊरवाडी विरुद्ध दयानंद शिरगाव मठपती आखाडा, ओमकार पाटील राशिवडे विरुद्ध सुमित कडोली मठपती आखाडा या सहा रटाळवण्या कुस्त्या बरोबरीत सोडवण्यात आल्या. मैदानात ५० पेक्षा अधिक कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. यातील नियोजित कुस्त्यांशिवाय जोड पाहून लावण्यात आलेल्या कुस्त्या. या चटकदार कुस्त्यांनी शौकीनांची मने जिंकली. मैदानात झालेल्या महिलांच्या तीन कुस्त्या सरपंच अनिता भोगण यांच्या हस्ते लावण्यात आल्या.
मैदानातील पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, लक्ष्मण भिंगुडे, महादेव पाटील, प्रकाश दळवी (तेऊरवाडी), भैरू पाटील व गावडू पाटील (निट्टूर), कल्लाप्पा चोपडे, शंकर पाटील, देवजी पाटील (कोवाड) यांनी काम पाहिले. धावते समालोचन कृष्णात चौगुले यांनी केले, सूत्रसंचालन रामा व्हन्याळकर यांनी केले. मैदानात सांगाव (ता. कागल) येथील हलगी सम्राट हनमंत घुले यांच्या रणहलगीने चैतन्य निर्माण केले होते.
आखाड्याच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष तानाजी आडाव, उपाध्यक्ष रामा वांद्रे, सचिव एम एन पाटील, जोतिबा बागिलगेकर, मारुती भोगण, जयराम पाटील, सुमित सुर्वे, जिवणू धर्मोजी, मारुती वडर, प्रमोद राजगोळकर आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment