वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी 'सापळे' लावणारे शिकारीच वन विभागाच्या 'सापळ्यात', न्यायालयाने सुनावली एक दिवसाची वन कोठडी - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2025

वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी 'सापळे' लावणारे शिकारीच वन विभागाच्या 'सापळ्यात', न्यायालयाने सुनावली एक दिवसाची वन कोठडी

 

पाटणे वनविभागाच्या पथकाने पकडलेले शिकारी, जप्त केलेला मुद्देमाल सोबत पथकातील अधिकारी व कर्मचारी

चंदगड : सी एल वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील जंगल क्षेत्रात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी फासके (सापळे) लावणारे शिकारीच वन विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. या चोरट्या शिकाऱ्यांना न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. 

      याबाबत चंदगड तालुक्यातील पाटणे वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, ``चंदगड तालुक्यातील पाटणे वन परिक्षेत्रातील माडवळे पैकी मौजे ढेकोळी जंगल परिसरात ईश्वर मारुती नाईक, वय २६ व गुंडू मारुती तळवार वय ३५ दोघेही राहणार कुद्रेमानी, तालुका जिल्हा बेळगाव हे वन्य प्राण्यांना अडकवण्यासाठी लावलेले सापळे काढत असताना रंगेहाथ वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून ३ फासके, कोयता व मोबाईल इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.`` ही घटना मंगळवारी दि. २/४/२०२५  रोजी  घडली. आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी चंदगड यांच्यासमोर हजर केले असता एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

          याच दिवशी माडवळे जंगल क्षेत्रात प्रभाकर पांडुरंग बोंद्रे वय ५५ राहणार ढेकोळी, ता चंदगड यांनेही वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने फासके लावले होते. हे फासके (सापळे) काढत असताना त्याला वन कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.  त्याच्याकडून लावलेले सापळे, विळा जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

      ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) प्रशांत आवळे, वनपाल बाळासाहेब भांडकोळी, जॉन्सन डिसोजा, नेताजी धामणकर, वनरक्षक प्रकाश शिंदे, मेघराज हुल्ले, सचिन आडसूळ, श्रेयस रायके, खंडू कोरे, पांडुरंग कुलाळ, वनसेवक वैजनाथ गावडे, अमित माने, पास्कल डिसोजा, वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर यांच्या पथकाने केली. या कामी उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे अशी माहिती वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment