ट्रक ड्रायव्हर ठरला एसटी चालक व प्रवाशांचा कर्दनकाळ, सुपे नजीकच्या ट्रक व एसटी अपघाताची थरारक स्टोरी - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2025

ट्रक ड्रायव्हर ठरला एसटी चालक व प्रवाशांचा कर्दनकाळ, सुपे नजीकच्या ट्रक व एसटी अपघाताची थरारक स्टोरी


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

        सुपे (ता. चंदगड) गावच्या हद्दीत काल दिनांक २२/०४/२०२५ रोजी दुपारी ३ वाजता ट्रक व बस चा भीषण अपघात झाला. यात बस ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघाताने चंदगड तालुक्यासह कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली. या बसमधून प्रवास करणाऱ्या जखमी प्रवासी श्रीमती रेखा बाळकृष्ण सुतार, फुलबाग गल्ली बेळगाव यांच्या हॉस्पिटल मधून दिलेल्या जबाबावरून चंदगड पोलिसांनी ट्रकच्या अज्ञात ड्रायव्हर विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार ट्रक ड्रायव्हर हाच एसटीतील वाहक, चालक व प्रवाशांचा कर्दनकाळ ठरला आहे.

          याबाबत चंदगड पोलिसांतील मिळालेले अधिक माहिती अशी, घटनेतील फिर्यादी सुतार या आपले माहेर कळसगादे (ता. चंदगड) येथे आल्या होत्या. दि २२ रोजी त्या आपली आई आशा व भाऊ विदू सदानंद सुतार यांच्यासह पार्ले, मटणवाडी, पाटणे फाटा मार्गे बेळगाव ला जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास चंदगड आगाराची ही बस सुपे फाटा नजीक आली असताना बेळगाव कडून चंदगडकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने बसला जोराची धडक दिली. यात चंदगड आगाराच्या बसचे उमदे चालक लक्ष्मण पांडुरंग हळदणकर (रा. चंदगड) हे जागीच मयत झाले. तर बसचे वाहक सुरेश मर्णहोळकर तसेच फिर्यादी स्वतः रेखा सुतार, आशाताई विठ्ठल सुतार, वेदु सदानंद सुतार आदी अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघात प्रसंगी ट्रक ड्रायव्हर निष्काळजीपणे भरधाव वेगाने ट्रक चालवत होता. या अज्ञात ट्रक ड्रायव्हर विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106 एक, 281 125 असं, 125 ब, 324 (4) (5) मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

      दरम्यान काही जखमींना बेळगाव येथे, काहींना गडहिंग्लज येथे तर काहींना चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून फिर्यादी रेखा सुतार या चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेथे चंदगड पोलीस ठाण्याचे अंमलदार पोहेकॉ माळी यांनी समक्ष जाऊन सुतार यांचा जबाब नोंदवून घेतला. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस सब इन्स्पेक्टर अरुण डोंबे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment