होसूर घाटातील रस्त्याचे भाग्य अखेर उघडले! कर्नाटक शासनाकडून रुंदीकरणासह रस्ता काम सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

10 May 2025

होसूर घाटातील रस्त्याचे भाग्य अखेर उघडले! कर्नाटक शासनाकडून रुंदीकरणासह रस्ता काम सुरू

  

कोवाड- बेळगाव मार्गावरील होसूर घाटातील रस्ता कामाचे छायाचित्र टिपले आहे. (विशाल पाटील, कालकुंद्री)

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    गेली १५ ते २० वर्षे प्रचंड दुरावस्थेत असलेल्या होसूर घाटातील अर्धा किलोमीटर लांबीच्या रस्ता कामाला कर्नाटक शासनाने सुरुवात केल्यामुळे या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे. यामुळे वाहनधारक व प्रवासी वर्गात समाधान पसरले आहे.

    कोवाड (ता. चंदगड) ते बेळगाव मार्गावरील महाराष्ट्र- कर्नाटक हद्दीवर असलेला होसूर घाट रस्त्यात पडलेल्या प्रचंड आकाराचे खड्डे धुळ पावसाळ्यात साचणारे खड्ड्यातील पाणी या बरोबरच अनेक कारणांनी गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध झाला होता. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्ता पूर्ण केला होता. तर कर्नाटक सरकारने बेळगाव पासून कर्नाटकातील शेवटचे गाव असलेल्या अतिवाड  फाट्यापर्यंत रस्ता करुन तिथून पुढे अर्धा किलोमीटर अंतरावरील महाराष्ट्र हद्दीपर्यंत चा रस्ता तसाच ठेवला होता. कर्नाटक व महाराष्ट्र विधानसभेच्या वेळीही सध्याच्या कर्नाटक राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही दोन वर्षे उलटूनही रस्ता दुर्लक्षितच राहिला होता. या रस्त्याची अधिक गरज आहे ती गडहिंग्लज, आजरा, कोवाड, कुदनूर, कालकुंद्री भागातून बेळगाव ला जाणाऱ्या लोकांना त्यामुळेच येथील अनेक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने अर्ज विनंती करूनही इकडे दुर्लक्ष झाले होते. 

   या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी २०२३ च्या पावसाळ्यात कागणी ता. चंदगड येथील महादेव जांभळे, पुरुषोत्तम सुळेगावकर, श्रीधर देसाई, गोवर्धन पुजारी, प्रवीण खाडे, माजी सैनिक बाळू बाचुळकर, अभिजीत कोरे, अभिजीत भोगण, प्रकाश आपटेकर, कल्लाप्पा परीट, पांडू बोंद्रे, मोहन सुळेगावकर आदी तरुणांनी भिक मांगो आंदोलन करून लक्ष वेधले होते. यावेळी जमा झालेल्या निधीतून त्यांनी रस्त्यात पडलेल्या प्रचंड आकाराच्या खड्ड्यांमध्ये खडी टाकून जेसीबी द्वारे सपाटीकरण केले होते. तथापि हे सपाटीकरण आठ दिवसात पुन्हा जैसे थे झाले होते. 

    २०२४ मधील पावसाळ्यात या रस्त्याकडे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी बेळगाव- वेंगुर्ले राज्य मार्गावर चिरमुरी- बाची येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर ही आता एक वर्ष हा रस्ता दुर्लक्षित होता. अखेर कर्नाटक शासनाचे डोळे उघडले असून  गेल्या आठ दिवसापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. जुना दुरावस्थेतील रस्ता जेसीबीच्या साह्याने उखडण्याचे काम सुरू असून पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण सह रस्ता होईल अशी आशा प्रवासी व वाहनधारक बाळगून आहेत.

No comments:

Post a Comment