आजरा: गोपाळ गडकरी / सी. एल. न्यूज आजरा
उत्तूर (ता. आजरा) येथील शासकीय पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रथम वर्ष बी. एन. वाय. एस. 2024 - 25 च्या प्रवेशास प्रारंभ व उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे आयुक्त डाॅ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी न. रा. पाटील आदी उपस्थित होते.
शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णांलयाचे मूळ कॉलेज उत्तुरमध्ये आहे. तथापि; या महाविद्यालयाची इमारत पूर्ण होईपर्यंत सुरुवातीची दोन वर्षे ते बहिरेवाडी येथील जे. पी. नाईक स्मारकाच्या इमारतीमध्ये भरणार आहे. या महाविद्यालय व रुग्णांलयासाठी 205 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पंधरा एकर विस्तीर्ण जागेवर मुख्य रुग्णालय महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. देशात यापूर्वी पाच योग महाविद्यालय असून उत्तुर येथील हे सहावे योग रुग्णालय देशातील अग्रेसर योग रुग्णालय बनेल, या रुग्णांलयामध्ये 4 हजारहून अधिक रुग्णांना सेवा मिळणार आहे. महाविद्यालयाची क्षमता 60 विद्यार्थ्यांची आहे. या ठिकाणी स्टाफ कॉर्टर्स, सुसज्ज ग्रंथालय, नॅचरोपॅथी थेरपीज केंद्र, ऑडिटोरियम, ट्रीटमेंट केंद्र, डायट सेंटर, स्विमिंग पूल, 200 मुलांचे व 200 मुलींचे वसतीगृह, चिकित्सा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, योगासन हॉल, योगावर आधारित चालण्याचा ट्रॅक अशा विविध सुविधा असणार आहेत. 252 कोटींच्या निधीच्या राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्यात आला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी दिली.
येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय दंत महाविद्यालय गडहिंग्लज तालुक्यात तर फिजिओथेरपी महाविद्यालय उत्तुर येथे सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरु असून यासाठी जागेची चाचपणी करण्यात येत आहे.
योग व निसर्गोपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, २५० खाटांचे कॅन्सर रुग्णालय आदी विविध प्रकारची कामे वैद्यकीय शिक्षण विभागा अंतर्गत करण्यात येत आहेत. तसेच; सीपीआर रुग्णालयाच्या इमारतींची दुरुस्ती व या परिसराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. रुग्णांच्या सोयीसाठी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट घडवण्यात येत आहे. येत्या दिवाळीदरम्यान सीपीआरच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होत असून हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील एकाही गरजू रुग्णांला वैद्यकीय उपचारासाठी मुंबई, पुण्याला जावे लागणार नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शिक्षण व शासकीय रुग्णालयांमध्ये चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी शासकीय रुग्णालयांची आहे. रुग्णांना जिल्ह्यातच उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्यास जिल्ह्यातील एकाही रुग्णाला खाजगी दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. राजीव निवतकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर व डॉ. मिलिंद निकुंभ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भाग्यश्री खोत यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालय स्थापनेबाबतची सविस्तर माहिती दिली. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, किरण कदम, उत्तुरचे सरपंच किरण अमनगी, बहिरेवाडीच्या सरपंच सौ. रत्नजा सावंत, डाॅ. वीणा पाटील, नरसू पाटील, शिवाजीराव देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment