प्राधिनिधीक संग्रहित छायाचित्र
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पुणे येथून चंदगडकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसच्या डिक्कीतून सुमारे ६ लाख रुपयांचा किमती ऐवज व कागदपत्रे असलेल्या दोन बॅगा लंपास झाल्यामुळे प्रवासी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. याला जबाबदार धरून ट्रॅव्हल्स बसचे मालक साईनाथ केसरकर, ड्रायव्हर कपिल टीक्का व क्लीनर संजीव करंजीवे या तिघां विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी रिमांड दिला आहे. याबाबतची फिर्याद प्रवासी व बॅगांचे मालक म्हातारू रामचंद्र कागणकर, वय ४६ (रा. तावरेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांनी पोलिसात दिली आहे. यावरून वरील तिघा आरोपीं विरोधात बी एस एन ३०३ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत चंदगड पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, ``फिर्यादी कागणकर हे ३ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता बिर्ला हॉस्पिटल चिंचवड पुणे ते नागणवाडी (ता. चंदगड) येथे येण्यासाठी ट्रॅव्हल बसमध्ये बसले. ही ट्रॅव्हल ४ जून रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास नागणवाडी येथे पोहोचली. ट्रॅव्हल बस मध्ये बसत असताना कागणकर यांच्याकडील सिल्वर रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये २ लाख ७९ हजार रुपयांचे सोने, यात गंठण व पट्टीचे डिझाईन असलेले लॉकेट, १ लाख ४२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व साखळी, ५८ हजार ७०० रुपये किमतीची सोन्याची ची कानातील रिंग जोड, ३० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नोटा यासह मुलांच्या शाळेची कागदपत्रे, कागणकर यांची वैयक्तिक कागदपत्रे व पर्सनल डायरी असे साहित्य तर दुसऱ्या कॉफी कलरच्या दुसऱ्या लेदर बॅग मध्ये २० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या नोटा तसेच ७० हजार रुपये किमतीच्या भेट वस्तू व कपडे असे सुमारे ५,९९,९००/- रुपये किमतीचे साहित्य होते.
ट्रॅव्हलमध्ये बसत असताना संशयित आरोपी क्लीनर संजीव करंजीवे याला कागणकर यांनी या दोन्ही बॅगांमध्ये किमती साहित्य आहे, व्यवस्थित ठेवा, अशी कल्पना दिली. यावर तुम्ही बस मधून उतरेपर्यंत बॅगा सांभाळणे ही आमची जबाबदारी आहे. तुम्ही बॅगा डिकी मध्ये ठेवा आणि निर्धास्त रहा असे सांगितले. क्लिनर व ट्रॅव्हल्सच्या विश्वासावर बॅगा दोन्ही ठेवून ते निवांत गाडीत बसले. सकाळी नागनवाडी येथे येऊन पाहतात तर दोन्ही बॅगा डिकी मध्ये मिळून आल्या नाहीत. यामुळे त्यांच्या पायाखालील वाळू सरकली. त्याबाबत फिर्यादी कागणकर यांनी ट्रॅव्हल्स चे मालक-चालक व क्लीनर यांच्याशी चर्चा करून पोलीस केस केली पाहिजे असे सांगितल्यानंतर आरोपी यांनी तुमची बॅग किंवा नुकसान भरपाई आम्ही देतो. पोलीस केस करू नका म्हणून आश्वासन देऊन त्यांनी रिकामी हाताने घरी पाठवले. मात्र त्यानंतर फिर्यादी यांनी फोन लावला असता तिघेही फोन उचलत नव्हते. त्यांच्याकडून होत असलेली टाळाटाळ पाहून फिर्यादी यांनी ट्रॅव्हलचे मालक साईनाथ केसरकर, चालक कपिल टीक्का व क्लीनर करंजीवे यांनी संगणमत करून ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत त्यांच्यावर विश्वासाने ठेवलेल्या दोन्ही बॅगा लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची फिर्याद चंदगड पोलीस ठाणे येथे दि. ९/६/२०२५ रोजी रात्री दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोहेकॉ नाईक हे करत आहेत.
No comments:
Post a Comment