व्यंकटराव संकुलात जागतिक योग दिन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2025

व्यंकटराव संकुलात जागतिक योग दिन उत्साहात

 


आजरा : सी एल वृत्तसेवा 

      आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, दररोज योगा केल्याने माणसाचे जीवन निरोगी, आनंदी व उत्साही राहून विद्यार्थ्यांना अभ्यासात त्याची निश्चितच मदत होते. मन, मेंदू व शरीर सदृढ ठेवायचे असेल तर विद्यार्थीदशेपासूनच दररोज योगासन तसेच प्राणायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. पुरातन काळापासून हिंदू संस्कृतीमध्ये योगाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचे महत्त्व जाणून जगातल्या इतर देशांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला आहे. पण आपल्या देशातील लोकांना  त्याचे महत्त्व पटवून द्यावे लागत आहे. त्यामुळे आज फक्त एक दिवस योगा न करता दररोज प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी आणि योगासनासाठी द्यावा. असे सांगून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

      क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना ढोल ताशांच्या तालावर योग प्रात्यक्षिक करून दाखवून त्यांचे कडून करवून घेतले. व प्रत्येक योगासनाचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक प्रकाश पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे शेलार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment