‘स्टाफ इंडिया, पारगड हेरिटेज रन’ ८ जून रोजी, बेळगाव सेंटरच्या दीडशे आर्मी जवानांसह देशभरातील १२०० स्पर्धकांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2025

‘स्टाफ इंडिया, पारगड हेरिटेज रन’ ८ जून रोजी, बेळगाव सेंटरच्या दीडशे आर्मी जवानांसह देशभरातील १२०० स्पर्धकांचा सहभाग

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

   'रन फॉर नेचर (एक धाव निसर्ग संवर्धनासाठी)' हे ब्रीदवाक्य घेऊन ऐतिहासिक किल्ले पारगड वर होणाऱ्या ' स्टाफ इंडिया, पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धा यंदा ८ जून रोजी होत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या चौथ्या पर्वात यंदा सीमारे बाराशे स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे यात  बेळगाव आर्मी सेंटरचे दीडशे जवान,  चंदगड पोलिस व वन विभाग चे जवान, पुणे मुंबई नाशिक बेंगलोर बेळगाव पणजी आधी ठिकाणचे मॅरेथॉन संघ व देशाच्या कानाकोपऱ्यातील मान्यवर स्पर्धक सहभागी होणार आहेत.

   स्टाफ इंडिया, किल्ले पारगड जनकल्याण संस्था, ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर एलएलपी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि चंदगड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ८ जून २०२५ रोजी सकाळी सात वाजता होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा देशभरातील धावपटूंसाठी एक आव्हान ठरली आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पारगड किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव धावपटूंसाठी रोमांचकारी ठरणार आहे. गतवर्षी विविध गटातून तब्बल ६०० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. 

     यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष असून यावर्षीही स्पर्धा ‘जॉय ऑफ जंगल’ ५ किमी. ‘जंगल ड्रीम रन’ १० किमी व ‘जंगल हाफ मॅरेथॉन’ २१ किमी अशा तीन श्रेणीमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण १ लाख रुपयाहून अधिक रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.  ‘निसर्गाचे रक्षक' मोहिमेंतर्गत निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांच्या प्रबोधना बरोबरच क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांसाठी जनजागृती निर्माण व्हावी व महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन केले जाते.

   स्पर्धेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे- ८ जून सकाळी ५ वाजता स्पर्धकांचे आगमन, कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती व नाष्टा, ६ ते ७ उद्घाटन व स्पर्धा प्रारंभ, ९ ते ११ पारितोषिक वितरण, निसर्ग संवर्धन विषयी मार्गदर्शन व परिसरात वृक्षारोपण होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते- श्री ए. एस. पाटील सर (सेवानिवृत्त प्राचार्य श्रीमान व्ही. पी. देसाई ज्युनिअर कॉलेज कोवाड यांचे निसर्ग, पर्यावरण संवर्धनात मानवाची भूमिका या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी चंदगडचे आजी-माजी आमदार, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, रेंजर, यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व क्रीडा क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील. सहभागी सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र, आकर्षक पदक, फळझाडाचे रोपटे, टी-शर्ट तर विजेत्यांना यासह रोख बक्षीसे दिली जातील. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असून ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी www.pargad.in या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन स्टाफ इंडिया चे सीईओ बिपिन चिरमुरे, स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे यांच्यासह संयोजकांनी  केले आहे.

      दरम्यान विद्यार्थ्यांसाठी निशुल्क असलेली ऑनलाईन नोंदणी फुल्ल झाल्याचे समजते. त्यामुळे यापुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्य कॅटेगरी मधून नोंदणी करावी लागेल.

No comments:

Post a Comment