पारगड मॅरेथॉन स्पर्धा : २१ किमी गटात उत्तर प्रदेशचा प्रथमेश व गडहिंग्लजची ऋतुजा पाटील प्रथम, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी पुर्ण केली स्पर्धा, १२५० स्पर्धकांचा सहभाग, आजी-माजी आमदारांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

09 June 2025

पारगड मॅरेथॉन स्पर्धा : २१ किमी गटात उत्तर प्रदेशचा प्रथमेश व गडहिंग्लजची ऋतुजा पाटील प्रथम, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी पुर्ण केली स्पर्धा, १२५० स्पर्धकांचा सहभाग, आजी-माजी आमदारांची उपस्थिती

 

स्पर्धेचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे. सोबत आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, स्टॉफ इंडियाचे सीईओ बिपीन चिरमुरे, गडहिंग्लज चे तहसीलदार ऋषिकेत शेळके आदी मान्यवरांसह स्पर्धक.

चंदगड : सी एल वृत्तसेवा

       'रन फॉर नेचर (एक धाव निसर्ग संवर्धनासाठी)' हे ब्रीदवाक्य घेऊन  चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ल्यावरून 'स्टॉफ इंडिया, पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धा ८ जून रोजी अभूतपूर्व उत्साहात पार पडली. स्टॉफ इंडिया, किल्ले पारगड जनकल्याण संस्था, ग्रुप ग्रामपंचायत पारगड मिरवेल नामखोल, ऑल्टिट्यूड क्वेस्ट, ॲडव्हेंचर एलएलपी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन मुंबई, वनविभाग चंदगड आणि चंदगड तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन केले जाते.


      यंदा या स्पर्धेच्या चौथ्या पर्वात मुंबई, बेंगलोर, कलकत्ता, दिल्ली, पुणे, नाशिक, लातूर, पणजी, बेळगाव अशा मोठ्या शहरांसह देशभरातून १२५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 

चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांनीही स्पर्धा पुर्ण केली.

      स्पर्धेतील गटनिहाय विजेते अनुक्रमे  पुढील प्रमाणे : २१ किलोमीटर जंगल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत अनुक्रमे प्रथमेश परमाकर (अलीगड उत्तर प्रदेश), बॉबी नायक (खानापूर- बेळगाव), रोहित संदीप मिश्रा (कराड), तर महिला गटात ऋतुजा विजय पाटील (जागृती जुनिअर कॉलेज  गडहिंग्लज),  डॉ. प्रतीक्षा पाटील (उदगीर, जि. लातूर), अंजली पुरोहित यांनी क्रमांक पटकावले. 

    जंगल ड्रीम रन १० किलोमीटर धावणे स्पर्धेत हूमान सेनापती (खानापूर, जि. बेळगाव), शुभम जाधव (ओमकार कॉलेज गडहिंग्लज), नारी वेळीप (गोवा) यांनी तर महिला गटात चंदना विठ्ठल गोरुले (शिवराज कॉलेज गडहिंग्लज), जान्हवी पांडुरंग मोहनगेकर (जयप्रकाश विद्यालय किणी, ता. चंदगड), स्वरांजली ईश्वर बांडगे (बेनकनहळ्ळी- बेळगाव) यांनी क्रमांक पटकावले.  

        जॉय ऑफ जंगल ५ किलोमीटर धावणे स्पर्धेच्या पुरुष गटात ऋतिक वर्मा (शिवराज कॉलेज गडहिंग्लज), रमेश पाटील (शिवराज कॉलेज गडहिंग्लज), उमेश आजमाने (वेणूताई कॉलेज कराड) तर महिला गटात प्रतीक्षा कुरबर (बेळगाव), मेघा सातपुते (टोपीवाला कॉलेज मालवण), भूमी बेळगावकर (जयप्रकाश विद्यालय किणी, ता. चंदगड) या स्पर्धकांनी क्रमांक पटकावले त्यांना रोख रक्कम, ढाल, फळ झाडाचे रोपटे, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्व धावपटूंना टी-शर्ट, पदक व प्रमाणपत्र देण्यात आले.

पोलीस निरिक्षक विश्वास पाटील यांनीही धावण्याची स्पर्धा पुर्ण केली.

       या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक स्टॉफ इंडिया संस्थेचे सीईओ बिपिन चिरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख वक्ते प्राचार्य ए. एस. पाटील यांनी पर्यावरण संवर्धन संवर्धनात मानवाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी ``पारगडच्या विकासासाठी आपण प्रथम प्राधान्य देऊ असे सांगितले. 

            यावेळी माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोलताना पारगड किल्ल्याच्या विकासासाठी तसेच येथील ऐतिहासिक ठेवे आहेत. तसे जतन करण्यासाठी  निधीची पूर्तता करण्याची ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावर चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके, पुणेचे तहसीलदार विकास भालेराव, चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, मंडल अधिकारी राजश्री पचंडी, रघुवीर शेलार, सौ. गीता चिरमुरे, सरपंच तुकाराम सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. जे. मोहनगेकर यांनी केले. विठ्ठल शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारगड ग्रामस्थ व आऊट प्ले स्पोर्ट फाउंडेशन मुंबईच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केली २१ किमी शर्यत पूर्ण, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनीही लक्ष वेधले.....

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पर्धा पूर्ण केली तो क्षण

     स्पर्धेच्या २१ किलोमीटर जंगल हाफ मॅरेथॉन गटात भाग घेऊन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही खडतर शर्यत पूर्ण केली. हे स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.  याशिवाय चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके व पुणे चे तहसीलदार विकास भालेराव यांनी १० किमी जंगल ड्रीम रन स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा पूर्ण केली. 




   यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे म्हणाले मी यापूर्वी सातारा व अन्य स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण केली होती. तथापि पारगड सारख्या इतिहास प्रसिद्ध किल्ल्यावरून धावण्याचा रोमांचकारी अनुभव मला कुठेही मिळाला नाही. या स्पर्धेचे नियोजन व संयोजन उत्कृष्ट वाटले. ही स्पर्धा अशीच निरंतर सुरू राहिली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

आम. शिवाजीराव पाटील यांच्याकडून पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी १० लाखांची देणगी

  आपल्या चंदगड तालुक्यात अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा होत असल्याचे पाहून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील हे सुद्धा भारावून गेले. त्यांनी स्टेजवरूनच पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी आपण ॲडव्हान्स स्वरूपात रोख १० लाख रुपयांची देणगी जाहीर करून संयोजकांना धनादेश घेऊन जाण्यास सांगितले. यावर्षी १२५० स्पर्धक सहभागी झाले असले तरी पुढील वर्षी ही संख्या ५ हजार पर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले. 

No comments:

Post a Comment