नायब तहसीलदार हेमंत कामत यांच्या निरोप समारंभावेळी उपस्थित
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील विविध कार्यालयात कार्यरत असलेल्या व आपली सेवा चांगल्या पद्धतीने बजावलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदली निमित्त चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सदिच्छा निरोप देण्यात आला.
![]() |
कोवाड येथे पो.हे.कॉ. जमील मकानदार यांना शुभेच्छा देताना चंदगड पत्रकार संघाचे सदस्य सोबत पोलीस अधिकारी |
चंदगड तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत यांची सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथे बदली झाली. तर पोलीस हेडकॉन्स्टेबल जमील मकानदार यांची आजरा पोलीस ठाणे येथे बदली झाली यानिमित्त दोघांना नुकताच सदिच्छा निरोप देण्यात आला.
तहसील कार्यालय चंदगड येथे झालेल्या निरोप कार्यक्रम प्रसंगी बोलताना नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी चंदगड तालुका पत्रकार संघाने आपले वेगळेपण जपले असून पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यात अनेक विधायक कार्यक्रम व उपक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी तालुक्यातील सर्व विभागांच्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग' स्पर्धा ही त्यापैकीच एक आहे. या स्पर्धेत तालुक्यातील तहसील कार्यालय, न्यायालय, पोलीस, वनविभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, पीडब्ल्यूडी, शिक्षक राष्ट्रीयकृत बँका, एसटी महामंडळ, महावितरण अशा सर्व प्रकारच्या विभागांचे अधिकारी व कर्मचारी या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा परस्पर समन्वय वाढला आहे. यामुळे तालुक्यातील अनेक प्रश्न गेल्या चार वर्षात मार्गी लागले आहेत. या स्पर्धा पुढेही अशाच प्रकारे पुढेही सुरू राहिल्या पाहिजेत. यासाठी तालुक्यातील विद्यमान व नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकामी सहकार्याची भूमिका स्वीकारली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.
याचबरोबर चंदगड पोलीस ठाणे अंतर्गत कोवाड दुरक्षेत्रचे अंमलदार पोहेकॉ जमील मकानदार यांची आजरा येथे बदली झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कोवाड पोलीस स्टेशन येथे सदिच्छा निरोप देण्यात आला. यावेळी चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सदस्य एस के पाटील, संजय मष्णू पाटील, विश्वास पाटील, संदीप तारिहाळकर यांच्यासह पत्रकार व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment