चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
संवेदना फाऊंडेशन या संस्थेतर्फे तालुक्यातील अनाथ मुलांना शैक्षणिक व जीवनापयोगी साहित्य वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने सर्वप्रथम विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलताना गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांनी संवेदना फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच शिक्षण विभागामार्फत अनाथ विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
याचवेळी ज्येष्ठ विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी यांनी संवेदना फाऊंडेशन ही केवळ आर्थिक मदत करणारी संघटना नसून माणसं उभी करणारी संघटना असल्याचे गौरवोद्गार काढले. संवेदना ही शाश्वत विकासासाठी कशी प्रयत्न करत आहे याची उदाहरणे त्यांनी दिली.
फाऊंडेशनच्या संवेदना भूषण या उपक्रमातील आणखी एक ठळक गोष्ट म्हणजे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तालुक्यातील एका अनाथ विद्यार्थ्यांला कॉलेज शुल्क भरण्यासाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
अनाथ विद्यार्थ्यांनी स्वतःला अनाथ समजू नये त्यांच्यासाठी संवेदना उभी असल्याचे आश्वासन सचिव संतराम केसरकर सर यांनी दिले. विद्यार्थ्यांनी केवळ मेहनत करावी, आयुष्यात जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा संवेदना मदतीचा हाथ घेऊन उभी असल्याची हमी त्यांनी दिली.
इच्छाशकी तुमची साथ आमची हे ब्रीद घेऊन संवेदना फाऊंडेशन वाटचाल करत आहे. संघटनेच्या दशकभराच्या कार्याचा आढावा प्रवक्ते संजय भोसले यांनी प्रास्ताविकात घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक सटुप्पा फडके होते. त्यांनी आर्थिक मदत करणाऱ्या भूषण गुंजाळ मित्र परिवाराचे आभार मानले. संवेदना ही संस्था चंदगड तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवू असा संकल्प केला. त्यासाठी अजित गणाचारी, गोपाळ गडकरी, विनायक गिरी, संजय साबळे, श्रीकांत पाटील, इंद्रजित होनगेकर, ॲड. नाकाडी, अनिल बागिलगेकर तसेच राजेंद्र कुंभार यांनी सहकार्य करण्याचा निर्धार बोलून दाखवला.
यावेळी ॲड. एम. ए. पाटील व आर्टिस्ट सुरेश लांडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देण्यात आली. या कार्यक्रमासाठी, संजय हरेर, युवराज तिप्पे, अमोल बांबरे, डॉ. देवराज सुतार, डॉ. पल्लवी निंबाळकर, राकेश वांगणेकर, श्रीतेज कवळेकर तसेच संवेदनाचे चंदगडमधील सदस्य यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक व सामाजिक वर्तुळातील अनेक लोकांनी आपली उपस्थिती लावली. उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी समाधान दिसून आले. सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार सुरेश देशमुख यांनी मानले.
No comments:
Post a Comment