कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
बेळगाव - वेंगुर्ले राज्य मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर रोज अपघातांची मालिकाच सुरू आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन, प्रशासन व बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक दहा वाजता तुर्केवाडी फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाबाबतचे निवेदन नुकतेच तहसीलदार चंदगड यांना देण्यात आले आहे.
![]() |
प्रताप ऊर्फ पिनू पाटील |
बेळगाव ते वेंगुर्ले या मार्गाची लांबी सुमारे सव्वाशे किलोमीटर असून कर्नाटकची उपराजधानी बेळगाव मधून सुरू होणारा हा राज्य मार्ग अरबी समुद्रावरील वेंगुर्ले बंदराला जोडतो. गेली अनेक वर्षे रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जा देऊन त्याचे सहा पदरीकरण करण्याच्या हालचाली गेली काही वर्षे सुरू आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही चार वर्षांपूर्वी ग्वाही दिलेली आहे. तथापि रुंदीकरणाच्या कोणत्याही हालचाली सद्यस्थितीत दृष्टिक्षेपात नाहीत. एकीकडे समृद्धी महामार्ग सारखे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असणारे मार्ग जनतेच्या माती मारण्याचे उद्योग सुरू आहेत. दुसरीकडे आहेत त्या रस्त्यात प्रचंड आकाराचे खड्डे पडले आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.
गेल्या काही वर्षात अरुंद रस्ता व खड्ड्यांमुळे सुमारे 200 वाहनधारक, प्रवासी व पादचारी नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. परिणामी ही कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. बऱ्याच वेळा बेळगाव कडून आंबोली व गोव्याकडे पर्यटनासाठी जाणारे तरुण मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवतात. यामुळे झालेल्या अपघातांत रस्त्यावरून चालणारे पादचारी व दुचाकी स्वार यांच्या सह स्वतःच्या मृत्यूला किंवा गंभीर जखमी होण्यास हे मद्यपी चालक कारणीभूत ठरले आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत प्रत्येक वेळी विधानसभा अधिवेशनातही प्रश्न उपस्थित केले जातात. यावेळी मंत्रालयातून मिळालेल्या आश्वासनांची अद्याप कोणतीच पूर्तता झालेली नाही.
सद्यःस्थितीत या मार्गावरील बेळगाव व चंदगड तालुका हद्दीत येणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या प्रचंड आकाराच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ उपाय योजना करावी. या मागणीसाठी चंदगड तालुका शिवसेनेच्या वतीने प्रताप ऊर्फ पिनू पाटील यांनी तहसीलदार यांना रास्ता रोको बाबतचे निवेदन दिले असून रास्ता रोको प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांसह उपस्थित राहून लोकांच्या रस्त्याबाबतच्या समस्या जाणून घ्याव्या अशी मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment