किटवाड धरण व धबधबा पाहण्यासाठी कर्नाटकातील पर्यटकांची गर्दी, परिसरात दारू बाटल्या फोडाफोडीमुळे शेतकरी हवालदिल - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2025

किटवाड धरण व धबधबा पाहण्यासाठी कर्नाटकातील पर्यटकांची गर्दी, परिसरात दारू बाटल्या फोडाफोडीमुळे शेतकरी हवालदिल

 

पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहणारा किटवाड धबधबा 

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

    चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटक सीमेवरील कालकुंद्री धरणाच्या सांडव्यातून निर्माण झालेला धबधबा पाहण्यासाठी कर्नाटकातील पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. तथापि धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांकडून काचेच्या दारू व बियर बाटल्या बाटल्यांची फोडाफोडी सुरू असल्याने काचांच्या त्रासामुळे परिसरातील शेतकरी अहवाल दिल बनले आहेत.

       किटवाड नजीकचा लघुपाटबंधारे प्रकल्प १५ दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हर फ्लो झालेल्या पाण्यापासून निर्माण झालेला धबधबा पर्यटकांना आकर्षित करण्यात येत आहे. या धबधब्यावर चंदगड व गडहिंग्लज तालुका व परिसर तसेच कर्नाटकातील बेळगाव शहरासह बेळगाव, हुक्केरी, खानापूर तालुक्यांतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तथापि या पर्यटनाला मद्यधुंद पर्यटकांच्या हुल्लडबाजीचे गलबोट लागत आहे. याला प्रशासनाने आवर घालावा अशी मागणी कुटुंबवत्सल पर्यटकांसह कालकुंद्री व किटवाड ग्रामस्थांनी केली आहे. 

किटवाड लघुपाटबंधारे प्रकल्प एक च्या सांडव्यात सांडव्यात बांधलेली झिगझॅग भिंत व नयनरम्य परिसर

       कृष्णा खोरे विकास योजनेतून १९९७ मध्ये कालकुंद्री हद्दीतील किटवाड नंबर १ व कुदनूर- किटवाड हद्दीतील नंबर २ हे ५०० मीटर अंतरात दोन लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आले आहे. शेती जलसिंचनसाठी बांधण्यात आलेल्या  प्रकल्पाच्या ओव्हर फ्लो पाण्यापासून निर्माण झालेला धबधबा, सांडव्यात असलेली महाराष्ट्रातील अशा प्रकारची औरंगाबाद जिल्ह्यानंतर केवळ दुसऱ्या क्रमांकाची झिगझॅग (नागमोडी) आकाराची धबधब्याच्या वर असणारा लोखंडी साकव- पूल, उंचावरून पडणारा धबधबा व निसर्गरम्य परिसर  यामुळे अल्पावधीतच हे ठिकाण परिसरातील पर्यटकाच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. 

       वर्षभर या परिसरात पर्यटकांचा वर्दळ असली तरी पावसाळ्यात धबधबा प्रवाहित झाल्यानंतर ही संख्या अनेक पटीने वाढते.  सुट्टीच्या वेळी येथे १ किलोमीटर अंतरापर्यंत चार चाकी वाहनांचे पार्किंग लागलेले असते. यावेळी सोबत येताना बरेच अति उत्साही पर्यटक खाद्यपदार्थ जेवणासोबत कोल्ड्रिंक व दारू बिअरच्या बाटल्या सोबत आणतात या काचेच्या बाटल्या इतस्ततः फेकल्या किंवा फोडल्या जातात. जनावरांसाठी वैरण कापताना किंवा शेती मशागत करताना या काचांचा त्रास परिसरातील शेतकऱ्यांना भोगावा लागतो. आधीच बहुताशी शेती धरण व बॅक वॉटर मध्ये बुडाली आहे. शिल्लक राहिलेल्या शेतीमध्ये अशा प्रकारे नासधूस चालू असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशा प्रकारांना प्रशासनाने आळा घालावा. अशी मागणी पर्यटक व परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

अनेक अतिउत्साही पर्यटकांना मिळाली जलसमाधी 

    धरणातील जलाशयात पाय घसरून तसेच पाण्याचा अंदाज नसतानाही पोहायला जाणाऱ्या व धबधब्याच्या खालील परिसरात साठलेल्या पाण्यामध्ये बुडून आत्तापर्यंत १५  पेक्षा अधिक पर्यटकांनी आपले प्राण गमावले आहेत. यातही कर्नाटकातून आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तथापि यातून बोध न घेता दरवर्षी अशा दुर्घटना सुरूच आहेत. पाटबंधारे विभागाचा एकही कर्मचारी गेली अनेक वर्षे इथे नेमणुकीस नाही पोलीस विभागाचे कर्मचारी अपवादानेच उपस्थित असतात. परिणामी हुल्लडबाजांना रान मोकळे झाले आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमून सूचनाफलक लावावे अशीही मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment