चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच बचतीची सवय निर्माण व्हावी, यासाठी अभिनव “माझी बँक” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन रवळनाथ हौसिंग सोसायटीचे बिजनेस हेड श्री प्रविण कापसे यांच्या प्रेरणादायी आवाहनाने झाले.
"बचत ही केवळ पैशांची नसून, ती स्वप्नांची जमापुंजी आहे," असे सांगत प्रविण कापसे यांनी विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिस्त, संयम आणि भविष्यदृष्टीची गोड सवय लावण्याचा संदेश दिला. त्यांनी “माझी बँक” उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि यामार्फत विद्यार्थ्यांचे आर्थिक साक्षरतेकडे पहिले पाऊल पडेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य आर. पी. पाटील यांनी उपक्रमाबद्दल माहिती देताना म्हणाले "प्रत्येक वर्गात एक बचत समिती नेमली आहे बचत गट प्रमुखाकडे विद्यार्थी दिवसभरात पैसे भरतात. गटप्रमुख शिक्षकांकडे पैसे जमा करतो . याबाबतच्या जमाखर्चाची नोंद विद्यार्थ्यांच्याकडे देण्यात आलेल्या पासबुकातून केली जाते . पैसे भरण्याची सक्ती नसल्याने विद्यार्थी केव्हाही आणि कितीही पैसे भरू शकतो . विद्यार्थ्यांना पैशाची गरज असेल तर एक दिवस अगोदर पूर्व सूचना देऊन पालकांची लेखी पत्र आणावे लागते . जमा झालेल्या पैशातून प्रत्येक वर्षी एका गरीब विद्यार्थ्याला बँकेमार्फत दत्तक घेतले जाते व त्याला कपडे वह्या पुस्तके व परीक्षेची फी भरली जाते . वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांची जमा झालेले पैसे निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परत केले जातात . या बचतीतून विद्यार्थी शैक्षणिक साहित्य खरेदी करतो या उपक्रमास पालकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे . "
कार्यक्रमाला उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे, मॅनेजर किरण कडोली, परशराम गावडे, व्ही. के. गावडे, टी. व्ही. खंडाळे, जे. जी. पाटील, वर्षा पाटील आणि विद्या डोंगरे ओंकार पाटील, सुहास वरपे हे मान्यवर उपस्थित होते. पहिल्याच दिवशी शंभर मुलांनी पैसे जमा केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी केले. ‘माझी बँक’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त, स्वावलंबन आणि बचतीचा दृष्टीकोन निर्माण होईल, असा विश्वास शाळेने व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment