चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
साप हा शब्द जरी ऐकला तरी मनात थरकाप उडतो. परंतु "भीती नको – जिज्ञासा बाळगा!" हा संदेश घेऊन दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे "सर्प स्नेह – समज, गैरसमज आणि विज्ञान" या विषयावर अनोख्या शैक्षणिक व्याख्यान व सर्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
शाळेच्या परिसरात सापडलेल्या धामण साप पकडण्यासाठी आलेल्या सर्प मित्र सदाशिव पाटील यांनी सा प पकडण्याचे प्रात्यक्षिक व त्या विषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य आर. पी. पाटील होते. तर प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे यांनी करताना विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
ढोलगरवाडी शाळेचे सर्पमित्र मार्गदर्शक प्रा. सदाशिव पाटील यांनी "सर्प – समज आणि गैरसमज" या विषयावर विद्यार्थ्यांना सहज भाषेत, पण प्रभावी शैलीत मार्गदर्शन केले. सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे वर्तन, उपयुक्तता, विषारी आणि बिनविषारी साप यामधील फरक, तसेच सर्पदंशानंतरचे योग्य प्रथमोपचार यांची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी प्रा. पाटील यांना अनेक प्रश्न विचारले आणि सरांनी तितक्याच संयमाने व विज्ञानाच्या आधाराने उत्तरे दिली. नागपंचमी आणि भारतीय संस्कृतीतील सर्पांचे स्थान, त्यामागील वैज्ञानिकता आणि पर्यावरणीय समतोल यावरही माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या सांगतेस सुरक्षिततेच्या सूचना देत, सापांप्रती आदर आणि समजूतदारपणा बाळगण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास व्ही. के. गावडे, जे. जी. पाटील, वर्षा पाटील, विद्या डोंगरे, सुहास वर्पे, ओंकार पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी ओघवत्या भाषेत केले. आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी मानले.
No comments:
Post a Comment