चंदगड : सी एल वृत्तसेवा
ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायत येथे कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांना अपशब्द वापरणे, ग्रामपंचायतच्या आर्थिक लेखाजोखा बाबत सदस्यांना अंधारात ठेवून कामकाज करणे, स्वतःची मर्जी व हेकेखोरपणाची वर्तणूक करणे अशा प्रकारचे आरोप असलेल्या दुंडगे (ता. चंदगड) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत आप्पाजी सनदी यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव तहसीलदार यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत अखेर मंजूर झाला. प्रशासनाकडून त्यांच्यावर आता कोणती कारवाई होणार? याबाबतची उत्सुकता तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे.
दुंडगे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी अडीच वर्षांपूर्वी झाली होती. या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आलेले चंद्रकांत आप्पाजी सनदी यांनी गेल्या अडीच वर्षात उपसरपंच व उर्वरित सदस्यांना विश्वासात न घेता कारभार करणे, ग्रामस्थांशी उद्धट वर्तन ठेवणे, आर्थिक कारभारात मनमानीपणे करणे अशा प्रकारच्या तक्रारी सुरू होत्या. अखेर अडीच वर्षानंतर ग्रामपंचायत मधील सरपंच व्यतिरिक्त सर्व ७ सदस्यांनी अविश्वास ठराव बाबत तहसीलदार चंदगड यांना १७/०७/२०२५ रोजी लेखी निवेदन दिले. त्यास अनुसरून दि. २४/०७/२०२५ रोजी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात याबाबतची सुनावणी घेण्यात आली. यावेळी ठरावाच्या बाजूने सर्व ७ सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला. यामुळे एकाकी पडलेल्या सरपंच चंद्रकांत सनदी यांना आपले पद गमवावे लागण्याची शक्यता आहे.
उपसरपंच लक्ष्मण गणपती पाटील, संजय कृष्णा खन्नुकर, पुंडलिक तुकाराम सुतार, वनिता विद्याधर पाटील, यमुना भरमू पाटील, सरोजिनी केशव पाटील, अंजना संतोष सुतार या ७ सदस्यांनी सरपंच चंद्रकांत सनदी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत अविश्वास ठराव दाखल केला होता.
तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत या ठरावावर मतदान घेण्यात आले. या घडामोडीमुळे दुंडगे गावाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आता नवीन सरपंचांच्या निवडीबाबत निवडणूक प्रशासन कोणता निर्णय घेते याची उत्सुकता लागली आहे. अविश्वास ठराव सुनावणीवेळी मंडल अधिकारी शरद मगदूम, तलाठी प्रशांत पाटील, ग्रामसेविका सुनीता कुंभार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी चंदगड पोलीस ठाण्याच्या वतीने ग्रामपंचायत आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment