चंदगड : सी एल वृत्तसेवा
जुन्नर (जिल्हा पुणे) चे आमदार शरद सोनवणे यांनी बेरड, रामोशी व पारधी समाजाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ चंदगड तालुक्यातील जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने २८ जुलै २०२५ रोजी निदर्शने करण्यात आली. चंदगड येथे मोर्चाने जाऊन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांचेकडे समाजाबद्दल विनाकारण बेताल वक्तव्य करणाऱ्या सोनवणे यांच्यावर नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ मधील तरतुदीनुसार तातडीने कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने आक्रमक झालेले बेरड, बेडर, रामोशी व पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अमोल नाईक (युवा प्रवक्ता महाराष्ट्र), सिताराम नाईक (चंदगड तालुका अध्यक्ष), सुरज नाईक (युवा अध्यक्ष चंदगड तालुका), विनोद नाईक (युवा उपाध्यक्ष), मारुती नाईक (युवा कार्याध्यक्ष तालुका चंदगड), कल्लाप्पा नाईक (शासकीय योजना उपाध्यक्ष चंदगड), शुभम नाईक (गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष), वैजनाथ नाईक (चंदगड तालुका सचिव), गोविंद नाईक (चंदगड युवा खजिनदार) आदींची उपस्थिती होती.
सोनवणे यांच्यावर कार्यवाही न झाल्यास राज्यभर चक्काजाम, रास्ता रोको, निषेध मोर्चे आदी आंदोलने करण्यात येतील असा इशारा यावेळी अमोल नाईक यांनी दिला.
No comments:
Post a Comment