केंद्रीय वन्यजीव प्राधिकरणाचा बडगा
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गेली ६० वर्षे सापांची शास्त्रीय माहिती देऊन समाजातील सापांंबाबतच्या अंधश्रद्धा व भीती दूर करून जनजागृती करण्याबरोबरच हजारो सर्पमित्र तयार करून लाखो सापांना जीवदान देणाऱ्या ढोलगरवाडी (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे उद्या दिनांक २९ जुलै २०२५ रोजी नागपंचमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तथापि जिवंत साप हाताळून माहिती देण्यावर केंद्रीय वन्य प्राणी संग्रहालय प्राधिकरण कडून लादण्यात आलेल्या नियमांमुळे उद्या सापांची शास्त्रोक्त माहिती पोस्टर, चित्र व प्रतिकृती मार्फत देण्यात येणार असल्याची माहिती सर्पालय व मामासाहेब लाड विद्यालय तसेच सत्यशोधक सट्टूपा वाघमारे जुनिअर कॉलेज यांच्या वतीने देण्यात आली आहे.
झू अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली (केंद्रीय वन्यजीव प्राणीसंग्रहालय), वन विभाग महाराष्ट्र यांनी पर्यावरण साखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या सापांबद्दल चे प्रबोधन शासकीय स्तरावरून स्वतः पुढाकार घेऊन केले पाहिजे. ते ढोलगरवाडी येथे गेली साठ वर्षे पदरमोड करून केले जात आहे. आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांनी सन १९६६ पासून सुरू केलेले हे कार्य नागपंचमी उत्सवामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचले आहे. शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, इंडियन आर्मी, पोलीस, वन विभागाचे जवान व कर्मचारी, सर्प संशोधक व अभ्यासक, फायर ब्रिगेड जवान यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्प हाताळण्याचे दिले जाणारे प्रशिक्षण केंद्र जाचक अटींमुळे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. ते टिकवण्यासाठी शासन व प्रशासन पातळीवरून प्रयत्नांची गरज आहे. नव्या जाचक नियमावली मुळे नागपंचमी उत्सव गेल्या ४-५ वर्षांप्रमाणे यंदाही केवळ चित्रफित व छायाचित्रांच्या आधारे होणार आहे. सर्प प्रेमी व भाविकांतून नव्या नियमावली बद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून ढोलगरवाडी साठी खास बाब म्हणून ही नियमावली शिथिल करावी. तसेच शासकीय अनुदानातून चंदगड तालुक्यात सुसज्ज सर्पोद्यानची उभारणी करावी अशी मागणी होत आहे.
विषारी, बिनविषारी साप, सर्पदंश, प्रथमोपचार, सापांबद्दल असलेली अंधश्रद्धा, गैरसमज दूर व्हावे यासाठी शास्त्रीय माहिती दिली जाते. ही माहिती पोस्टर, चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून येथील शेतकरी शिक्षण मंडळ संचलित मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सटूप्पा टक्केकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व गावातील सर्पमित्र उपस्थित नागरिक व भाविकांना देणार आहेत. अशी माहिती नुकत्याच झालेल्या नियोजन बैठकीवेळी देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ नितीन चौगुले, उपाध्यक्ष तानाजी वाघमारे, मुख्याध्यापक एन. जी. येळ्ळूरकर, सर्पोद्यान विभाग प्रमुख प्रा. सदाशिव पाटील, प्रकाश टक्केकर, व्ही. आर. पाटील, प्रा. एन. आर. पाटील, मधुकर बोकडे, संदीप टक्केकर, सौ भाग्यश्री गुरव आदींसह वनविभागाची अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी'
सर्पोद्यान साठी विस्तीर्ण जागेसाठी संस्था व वनखात्याच्या वतीने तिलारी किंवा वाघोत्रे परिसरात विस्तीर्ण जागतिक दर्जाचे अद्यावत असे सर्पोद्यान उभे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील आदी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे जाणीवपर्वक प्रयत्न करावे अशी विनंती संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे- टक्केकर यांनी यावेळी केली. कार्यक्रमादरम्यान विषारी बिनविषारी सापांची माहिती, प्रथमोपचार व सापाबाबतच्या अंधश्रद्धा याबाबत माहिती देणाऱ्या सर्पोद्यान या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
No comments:
Post a Comment