![]() |
धनगरवाडयाकडे जाताना चिखलात अडकलेल्या दूचाकीसह शिक्षक सोमनाथ डोंगरे |
कानूर / सी एल न्यूज (एस के पाटील)
सतत कोसळणारा पाऊस, पायाखाली चिखलाचे साम्राज्य, आजूबाजूला घनदाट जंगल, जंगलात पटेरी वाघाचे, अस्वलांचे अन गव्यांचा वावर अशातून जीव मुठीत घेऊन सतत बुझवडे (ता. चंदगड) येथील जंगलात असणाऱ्या धनगर वाड्यातील शाळेकडे ज्ञानदानासाठी चिखल तुडवड जाणाऱ्या शिक्षकाचे व अशा जंगलात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे दुःख शासनाला दिसणार का? शिक्षक विद्यार्थी व पालकांच्या वाटेला आलेला वनवास संपणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात अवकाशात झेपावून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परतणाऱ्या अवकाश विराचे स्वागत तर संपूर्ण देशाने केले. पण चंदगड मधील धनगर वाड्यावर पोहचण्यासाठी, पाणी, विज व आरोग्य याच्या कमतरतेमुळे नरकयातना सहन करणाऱ्या येथील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची दया आता तरी शासनाला येणार काय?
बुझवडे पासून 4 ते 5 किमी अंतरावर जंगलात धगरवाडा वसला आहे येथे इयत्ता चौथी पर्यंत ची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत 4 विद्यार्थी असून सोमनाथ श्रीधर डोंगरे हे प्रभारी मुख्याध्यापक ज्ञानदानाचे कार्य करतात. बुझवडे ते धनगरवाडा जाताना जोरदार पावसाने झालेल्या चिखलात सोमनाथ डोंगरे यांची दुचाकी अडकली. सायंकाळी पाच नंतर बुझवडे येथील शिक्षक तुकाराम घोळवे याना बोलावून घेऊन अडकलेली दूचाकी अथक प्रयत्ना नंतर बाहेर काढली. तर काल शाळेतील बुट्टीमध्ये चक्क विषारी पटेरी मण्यार निवांत वेटोळे मारून बसला होता. शाळेच्या तुटलेल्या खिडक्या, शाळेच्या अंगणात वाढलेले गवत, सोसाट्याचा वारा, जोरदार कोसळणारा पाऊस, आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर अन अशा परिस्थितीतही चार किमी पायपीट करून ज्ञानदान देणारे सोमनाथ डोंगरे हे शिक्षक अन ज्ञान घेणारे विद्यार्थी खरच धन्य आहेत. अशा ठिकाणी शिक्षणाची गंगा तेही आनंददायी शिक्षण कसे चालू ठेवायचे? शासन याचा कधी गांभीर्याने विचार करणार का? एका बाजूला कोट्यावधी रूपये खर्चून झालेला समृद्धी महामार्ग आणि आता ज्यासाठी आंदोलने होत आहेत तो शक्ती पिठ मार्ग जरूर करावा. पण येथे केवळ काही लाखात होणारा रस्ता हा वनविभागाच्या कात्रित सापडला आहे. प्रशासन आणि पदाधिकारी या ठिकाणी जाऊन केवळ आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत. प्रत्यक्ष कारवाई काहीच नाही. रस्ता होणार, सुविधा मिळणार या आशेवर अनेक पिठ्या होऊन गेल्या. पण या सर्वांच्या पदरी निराशाच पडली आहे. आता तरी शासनाचे डोळे उघडणार की शासन अशीच बघ्याची भूमिका घेणार हे येणारा काळच ठरवेल. सध्या तरी येथील शिक्षक विद्यार्थी व पालकांचे निसर्गाशी झगडत जगणे चालू आहे.
आज शासनाने कोवाड आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व एका कर्मचाऱ्याला या शाळेची पहाणी करण्यासाठी पाठवले होते. पण या दोन्ही कर्मचाऱ्यांना पायी चालत जात जंगलातील शाळा शोधताना भर पावसाळ्यातही घाम फुटला होता.
No comments:
Post a Comment