माणगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न, शिक्षकांच्या विकासासाठी सखोल मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2025

माणगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न, शिक्षकांच्या विकासासाठी सखोल मार्गदर्शन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           चंदगड तालुक्यातील माणगाव केंद्रात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दि. ३० जुलै रोजी पार पडली. नव्या शैक्षणिक धोरणांनुसार शिक्षकांच्या समज आणि अंमलबजावणीसाठी आयोजित या परिषदेमध्ये विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. स्वागत नंदकुमार होनगेकर यांनी केले, तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख सदानंद पाटील यांनी करून शिक्षण विभागाच्या धोरणात्मक उपक्रमांची माहिती दिली.

        राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता परख (PARAKH) आणि राज्यातील पीजीआय (PGI) अहवालांवर आधारित सध्याची कोल्हापूर व महाराष्ट्रातील स्थिती अनिता गावडे यांनी विशद केली. शिक्षण गुणवत्ता निर्देशांकातील सुधारणा कशी करता येईल, यावर त्यांनी प्रकाश टाकला.

            नवीन अभ्यासक्रम राबविताना इयत्ता १ ली व २ री साठी विषय योजना व शालेय वेळापत्रक कसे असावे, "आयडॉल शिक्षक निवड व मूल्यवर्धन" यावर मंगल नोकुडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांचा केंद्रबिंदू ठेवून शाळांचे नियोजन कसे असावे याचे महत्त्व अधोरेखित झाले.

        "आयडॉल शिक्षक निवड व मूल्यवर्धन प्रशिक्षण 3.0" या उपक्रमावर वैशाली काकडे यांनी सखोल माहिती दिली. शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण कार्य करून आपली भूमिका अधिक प्रभावी बनवावी, यासाठी त्यांनी विविध उदाहरणांसह मांडणी केली.

        या परिषदेमध्ये केंद्रातील शिक्षकांच्या मागणीनुसार उपयुक्त शैक्षणिक पुस्तक परिचय सादर करण्यात आला. शिक्षकांनी प्रत्यक्ष वापरात आणता येतील अशी दर्जेदार पुस्तकांची शिफारस केली गेली. चंदगड पंचायत समितीचे गट शिक्षनाधिकारी वैभव पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे प्रशासकीय सूचना देऊन माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपाजी रेडेकर यांनी तर आभारप्रदर्शन संध्या घोळसे यांनी केले.

    आनंत पाटील यांची चंदगड तालुका शिक्षक समितीच्या कार्यवाहक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक समाजातून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment