चंदगड : सी एल वृत्तसेवा
गेली ६५ वर्षे कर्नाटकात डांबण्यात आलेली मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात घ्यावी. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती मार्फत तीन पिढ्या आंदोलन सुरू आहे. इतक्या वर्षात अनेक पक्षांच्या राजवटी आल्या आणि गेल्या. पण कर्नाटकातील मराठी बांधवांवरील होत असलेला अन्याय दूर झाला नाही किंवा त्यांची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छाही पूर्ण झाली नाही.
सध्या हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. या खटल्याबद्दल गेल्या अनेक वर्षांत सर्वोच्च न्यायालयाच्या तारखावर तारखा सुरू आहेत. दुसरीकडे कर्नाटकात येणाऱ्या सर्व शासन कर्त्यांकडून येथील मराठी जनतेवर कन्नड भाषा सक्तीसह अन्याय अत्याचार चालूच आहेत. येथील जनता कर्नाटकच्या वरवंट्याखाली भरडली जात आहे.
या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक तज्ञ कमिटी नेमली आहे. यापूर्वी कमिटीवर असलेल्या अनेक अध्यक्षांनी इकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही. असा आरोप सीमा भागातील मराठी जनता करत आहे. व महाराष्ट्रातूनही असा आरोप होत आहे. सध्या या समितीवर कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून या प्रश्नासाठी मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. या संदर्भाने बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी येथील मराठी जनतेच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव येथील नेते रमाकांत कोंडुसकर यांनी माने यांची त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट घेतली.
आज ४ जुलै २०२५ रोजी भेट घेऊन सीमा प्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल खा. माने यांचे अभिनंदन व सत्कार केला. यावेळी येत्या काळात लवकरात लवकर तज्ञ समितीची बैठक लावून व या अधिवेशनाच्या काळात सीमा प्रश्न हा विषय नक्कीच अधिवेशनात मांडू. वैद्यकीय, शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात सुद्धा आपण सीमा भागासाठी अजून चांगल्या रीतीने सेवा पोहचवू. सीमा भागातल्या जनतेवर होणारा अन्याय थांबवू असे आश्वासन दिले.
दोन दिवसापूर्वी एका महाभाग राज्यसभा सदस्यांने सीमा प्रश्न हा संपलेला विषय आहे. असं वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले. त्यामुळे समस्त सीमा भागातल्या जनतेचा अपमान केला होता. त्याबद्दलही या भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर आपण संसदेत नक्की आवाज उठवू असे आश्वासन माने यांनी कोंडुस्कर व इतर नेत्यांना दिल्याचे समजते.
No comments:
Post a Comment