शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर यांची १७ रोजी कोल्हापुरात 'ग्रंथ तुला' - चंदगड लाईव्ह न्युज

13 August 2025

शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर यांची १७ रोजी कोल्हापुरात 'ग्रंथ तुला'

  


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 

       चंदगड तालुक्याचे कुस्ती क्षेत्रातील मानबिंदू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर (तात्या) यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कुस्ती पंढरी कोल्हापूर येथे 'ग्रंथ तुला' होणार आहे.

कोवाड कुस्ती मैदानात आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना पैलवान व वस्ताद विष्णू जोशीलकर
        विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, विश्वपंढरी हॉल, हॉकी स्टेडियम जवळ कोल्हापूर येथे १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज भूषवणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर व चंदगड मतदार संघाचे आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित राहणार आहेत. 

कोनवडे येथील वस्ताद पैलवान गोलमेज परिषदेत मार्गदर्शन करताना पैलवान विष्णू जोशीलकर 

        या शिवाय शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू पी. एस. पाटील, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, वीज वितरण कंपनीचे अधिकारी संजय ढाके, वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई, निवृत्त सहाय्यक निबंधक अरुण काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विज कामगार संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष तानाजी मारुती हातकर हे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. 

       चंदगड तालुक्यातील किणी गावचे सुपुत्र असलेल्या विष्णू जोशीलकर यांनी कुस्तीतील महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेता अशा देदिप्यमान वाटचालीत चंदगड तालुका व कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देश पातळीवर पोहोचवले.  वीज वितरण कंपनीत एक दमदार अधिकारी म्हणून काम केले.  वीज कंपनीतील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप टाकली. तालीम चित्रपटातील त्यांची भूमिका अजूनही रसिकांच्या मनावर मनात घर करून आहे यानंतर त्यांनी दूरदर्शन मालिकांच्या रूपाने छोट्या पडद्यावरही आपला अभिनय दाखवला. हे करत असताना विज  कामगार संघटनेचे पुढारी व मार्गदर्शक म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. 

चंदगड तालुक्याच्या कुस्ती क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दोन दिग्गज पैलवान 'मुंबई महापौर केसरी पै. कै. मारुती नाईक (निट्टूर) व महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर (किणी) हे कालकद्री येथे १९९५ मध्ये धुलीवंदन निमित्त झालेल्या कुस्ती मैदानात कुस्ती लावत असताना. सोबत कालकुंद्री येथील कुस्ती पंच.
(फोटो- पत्रकार श्रीकांत पाटील कालकुंद्री)

                एक कुस्तीगीर व त्यानंतर विविध माध्यमातून पै. जोशीलकर यांनी केलेली सेवा यांची दखल घेऊन त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य विज कामगार महासंघाचे सर्व पदाधिकारी व कामगार व जोशीलकर प्रेमी मित्रांच्या वतीने त्यांची 'ग्रंथ तुला' करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमास येताना पुष्पहार, पुष्पगुच्छ न आणता  वाचनीय पुस्तके आणावी असे आवाहन गौरव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ही पुस्तके नंतर ग्रामीण भागातील शाळांना भेट स्वरूपात दिली जाणार आहे. 

        जोशीलकर तात्या यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ तसेच चंदगड तालुक्यातील कुस्ती प्रेमींच्या  वतीने दीर्घायुरारोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

No comments:

Post a Comment