कुदनूरचे पोलीस पाटील नामदेव लोहार यांना 'जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील' पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2025

कुदनूरचे पोलीस पाटील नामदेव लोहार यांना 'जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील' पुरस्कार

महसूल दिनानिमित्त आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते स्वीकारताना नामदेव लोहार.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
      कुदनूर (ता. चंदगड) चे गावकामगार पोलीस पाटील नामदेव अर्जुन लोहार यांना महसूल व वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. नामदेव लोहार हे गेली १३ वर्षे तालुक्यातील सर्वात मोठ्या व अति संवेदनशील अशा कुदनूर गावचे पोलीस पाटील म्हणून काम पाहत आहेत.
   त्यांना गतवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते तालुकास्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यंदाही या विभागातील उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराचा मान त्यांना देण्यात आला.
  महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्व आहे. कायदा व सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, मदतकार्य, महसुली वसुली, निवडणूक इत्यादी कामातील कर्मचाऱ्यांचे योगदान पाहून दरवर्षी १ ऑगस्ट या महसूल दिनानिमित्त हे पुरस्कार प्रदान केले जातात. सन २०२४-२५ मधील नामदेव लोहार यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
  कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कार्तिकेयन एस., कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment