सीआरपीएफ जवानाची हरवलेली कागदपत्रे व रोकड प्रामाणिकपणे परत करणाऱ्या परशुराम कातकर यांचे कौतुक - चंदगड लाईव्ह न्युज

31 August 2025

सीआरपीएफ जवानाची हरवलेली कागदपत्रे व रोकड प्रामाणिकपणे परत करणाऱ्या परशुराम कातकर यांचे कौतुक

 

हरवलेले पॉकिट परत करताना परशुराम कातकर सोबत प्रा. नागेश गुरव, गोपाळ भोसले

चंदगड / सी एल वृत्तसेवा 

       बेळगाव येथील परशुराम मारुती कातकर हे आज दि. ३१ ऑगस्ट  २०२५ रोजी दाटे येथे कामानिमित्त जात होते. शिनोळी (ता. चंदगड) येथील तालूका संघाच्या खत कारखान्याजवळ त्याना रस्त्यामध्ये पॉकिट सापडले. त्या पाकिटात रोख रुपये व अत्यंत महत्वाची कागदपत्रे व ओळख पत्र होते. ओळख पत्रावरून हे पॉकिट महिपाळगड येथील जवान अजित विष्णू भोसले यांचे असल्याचे स्पष्ट झाले. परशुराम यांनी हे पाकिट  खत कारखान्याच्या गेटला उभे असणाऱ्या पत्रकार विश्वास पाटील व प्रा. नागेश गुरव यांच्याकडे  दिले. लगेच विश्वास पाटील यानी तेऊरवाडीचे  पत्रकार एस. के. पाटील यांच्याशी संपर्क केला. एस. के. पाटील यांनी  महिपाळगड येथील आपले मित्र  मुख्याध्यापक राजीव भोगण व गोपाळ भोसले यांना फोनवरून याबाबत माहिती दिली. तात्काळ गोपाळ भोसले व सीआरपीएफ जवान अजित भोसले यानी  तालूका संघाच्या गेटवर जाऊन कागदपत्रे व पाकिट ताब्यात घेऊन सर्वांचे आभार मानले. पॉकिटमध्ये पैसे असूनही त्याचा मोह न धरता  ते सर्व जसेच्या तसे परत केल्याबद्दल परशुराम यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment